मोबाइल चोरांचा उच्छाद

By Admin | Updated: May 19, 2014 04:54 IST2014-05-19T04:54:24+5:302014-05-19T04:54:24+5:30

मोबाइल चोरांनी मध्य रेल्वेमार्गावर अक्षरश: हैदोस घातला असून, २0१४ च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतच २३७ चोर्‍या झाल्या आहेत.

Mobile thief | मोबाइल चोरांचा उच्छाद

मोबाइल चोरांचा उच्छाद

मुंबई : मोबाइल चोरांनी मध्य रेल्वेमार्गावर अक्षरश: हैदोस घातला असून, २0१४ च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतच २३७ चोर्‍या झाल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या मार्गावर फक्त ४९ टक्केच चोर्‍यांचा छडा लावण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. सध्या बाजारात महागडे मोबाइल आले असून, त्यामुळे चोरांनी मोबाइल चोरीकडे आपला मोर्चा वळवल्याचे खुद्द रेल्वे पोलीस सांगतात. टच स्क्रीनसारख्या अँड्रॉइड मोबाइलची किंमत ही ७ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पाकीटमारी करण्यापेक्षा मोबाइल चोरीकडेच चोर लक्ष देत आहेत. मध्य रेल्वेमार्गावर तर जानेवारी ते मार्च २0१४ पर्यंत २३७ मोबाइल चोर्‍या झाल्या असून, यात कल्याण विभागात सर्वाधिक ९४ चोर्‍यांची प्रकरणे दाखल आहेत. तर त्यानंतर सीएसटी विभागात ८७ चोर्‍यांच्या केसेस दाखल असल्याचे सांगण्यात आले. यानंतर हार्बर मार्गाचा नंबर लागत असून, ५६ चोर्‍या झाल्या आहेत. तीन महिन्यांत एकूण चोरी गेलेल्या मोबाइलच्या किमती ३९ लाख १ हजार १३ रुपये एवढी आहे. मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेमार्गावरही तीन महिन्यांत ११५ मोबाइल चोर्‍या झाल्या असून, यात वांद्रे विभागात ६१ चोर्‍या झाल्या आहेत. त्यानंतर वसई विभागात ५४ चोर्‍यांच्या केसेस दाखल असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Mobile thief