ज्येष्ठ दाम्पत्याला त्यांच्याच घरात पाय ठेवू न देणाऱ्या परप्रांतीयाला मनसेचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:29 IST2025-10-16T09:29:09+5:302025-10-16T09:29:19+5:30
नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लव्हाळी वाडी परिसरात संजय आणि संजना सावंत या ज्येष्ठ दाम्पत्याचा ‘माथेरान व्हॅली’ नावाचा बंगला आहे.

ज्येष्ठ दाम्पत्याला त्यांच्याच घरात पाय ठेवू न देणाऱ्या परप्रांतीयाला मनसेचा दणका
- विजय मांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये मराठी ज्येष्ठ दाम्पत्याला त्यांच्याच घरात पाय ठेवू न देणाऱ्या परप्रांतीय भाडेकरूला मनसेने चांगलाच दणका दिला. त्यामुळे २४ तासांत दाम्पत्याला हक्काच्या घराचा ताबा मिळाला. तसेच परप्रांतीयाला बोरा-बिस्तरा उचलवून तिथून काढता पाय घ्यावा लागला.
नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लव्हाळी वाडी परिसरात संजय आणि संजना सावंत या ज्येष्ठ दाम्पत्याचा ‘माथेरान व्हॅली’ नावाचा बंगला आहे. त्यांनी हा बंगला १ ऑक्टोबर २०२४ मध्ये हेमंद्र कुमार प्रसाद श्रीवास्तव या परप्रांतीय व्यक्तीस ११ महिन्यांच्या करारावर भाड्याने दिला होता. पण, करार संपल्यानंतरही श्रीवास्तव यांनी बंगला रिकामा करण्यास नकार दिला. दोन महिन्यांचे भाडे थकवले. फोन उचलणेही बंद केले. शिवाय मालकाला त्यांच्याच घरात येऊही दिले नाही.
सावंत दाम्पत्य आत्महत्येच्या विचारापर्यंत गेले होते. मात्र, त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी मनसैनिकांसह नेरळ गाठले. यावेळी परप्रांतीय ‘प्रोफेसर’ने पोलिसांच्या आडोशाला लपण्याचा प्रयत्न केला; पण, पोलिसांनीही घर रिकामे करण्यास सांगितल्यानंतर श्रीवास्तव यांनी बंगला सोडला.
चावी हातात येताच चेहऱ्यावर आनंद
घराच्या चाव्या मूळ मालकाच्या हातात देताच त्यांच्या चेहऱ्याववर आनंद आणि समाधान दिसले. यावेळी सावंत यांनी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, तालुकाध्यक्ष यशवंत भवारे, उपतालुकाध्यक्ष प्रवीण राणे, स्वप्निल शेळके, करण खडे, तेजश्री भोईर, पारस खैरे, निवृत्ती गोसावी, समीर वेहले यांचे आभार मानले.
महाराष्ट्रात परप्रांतीय व्यक्तीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यात मनसे मागे हटणार नाही. प्रसंगी आमच्यावर गुन्हे घेऊ; परंतु, अशा व्यक्तींना मनसे स्टाईलमध्येच धडा शिकविला जाईल.
- जितेंद्र पाटील, जिल्हा अध्यक्ष, मनसे