Raj Thackeray: "भाजपनंही हे लक्षात ठेवावं...", राज ठाकरेंनी वर्धापन दिनी दिला सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 20:32 IST2023-03-09T20:32:26+5:302023-03-09T20:32:44+5:30
MNS: आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन असून या निमित्ताने ठाण्यात राज ठाकरेंनी सभेतून मनसैनिकांना मार्गदर्शन केले.

Raj Thackeray: "भाजपनंही हे लक्षात ठेवावं...", राज ठाकरेंनी वर्धापन दिनी दिला सूचक इशारा
ठाणे: आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) 17 वा वर्धापन दिन असून या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन सभागृह येथे राज ठाकरेंनी सभेतून महाराष्ट्र सैनिकांना सतराव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोणती सत्ता नसताना तुमच्यात जी ऊर्जा आहे, ती पक्ष पुढे नेत असते त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो असे ठाकरेंनी म्हटले. तसेच संदीप देशपांडेवर हल्ला करणाऱ्यांना देखील राज यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे.
दरम्यान, ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना ते समजेल. माझ्या मुलांचं रक्त असं मी वाया जावू देणार नाही, अशा शब्दांत राज यांनी देशपांडे यांच्या हल्लेखोरांना इशारा दिला. अनेक पत्रकार अनेक पक्षांना बांधले आहेत. ते त्यांना प्रश्न विचारत नाहीत, असेही त्यांनी म्हटले. तसेच राजू पाटील एकटा विधानसभेत पक्षाची बाजू पक्षाची मांडत आहे. 'एक ही है लेकीन काफी है' असं म्हणत राज ठाकरेंनी आमदार राजू पाटील यांचे कौतुक केले.
भरती-ओहोटी येतेच लढत राहणार - राज ठाकरे
भाजपला सूचक इशारा देताना राज यांनी म्हटले, "भरती-ओहोटी येतच असते त्यामुळे लढत राहणार. याशिवाय भाजपनंही हे लक्षात ठेवावं की, सध्या भरती चालू आहे", अशा शब्दांत राज यांनी सत्ताधारी भाजपला सूचक इशारा दिला. मशिदीवरील भोंग्याचा समाचार 22 तारखेला शिवतीर्थावर घेणारच असे राज यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"