Missing child from Mumbai found in Thane | मुंबईतून बेपत्ता झालेला मुलगा मिळाला ठाण्यात

वागळे इस्टेट पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्देपोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेल्या मुलाचा लागला शोधवागळे इस्टेट पोलिसांची कामगिरीमुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात झाला होता गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबईतील वाकोला येथून बेपत्ता झालेला ११ वर्षीय शुभम जितेंद्र सुर्वे हा विद्यार्थी ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळे सुखरूप मिळाला. त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेट, तीनहातनाका येथे १७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक वैशाली रासकर या आपल्या पथकासह निवडणुकीच्या व्हीआयपी बंदोबस्तासाठी हजर होत्या. त्यावेळी शालेय गणवेश परिधान केलेला एक मुलगा तिथे फिरताना त्यांना आढळला. संशयावरून त्यांनी त्याला विश्वासात घेत आस्थेने चौकशी केली. तेव्हा शुभम जितेंद्र सुर्वे असे आपले नाव असून खोली क्रमांक ६५, कलिना शिवनगर, सांताक्रूझ या भागात वास्तव्यास असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा त्याच्या गळ्यात असलेल्या शाळेच्या ओळखपत्रावरील त्याच्या वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर या पथकाने संपर्क साधला. तो आपलाच मुलगा असून त्याच्या अपहरणाची तक्रार मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात १७ आॅक्टोबर रोजी दाखल केल्याचेही जितेंद्र सुर्वे यांनी सांगितले. तो मिळाल्याची माहिती वाकोला पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कल्याणी सकुंडे यांनाही देण्यात आली. ही माहिती मिळताच त्याचे वडील ठाण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण, उपनिरीक्षक रासकर यांनी त्याला खातरजमा करून त्याला सुखरूपपणे त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले. हा मुलगा हरविल्याची कोणतीही माहिती मिळालेली नसतानाही केवळ संशयावरून त्याची विचारपूस केल्यानंतर या सर्व प्रकाराचा उलगडा झाला. अर्थात, तो ठाण्यात कसा आला, याबाबत मात्र तो कोणतीच योग्य माहिती देऊ शकला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Missing child from Mumbai found in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.