मीरा-भाईंदरच्या भाजपच्या लाचखोर नगरसेविकेला ५ वर्षांचा सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:18 AM2019-12-12T05:18:07+5:302019-12-12T05:18:50+5:30

शिक्षेनंतर कारागृहात रवानगी

Mira-Bhayander BJP's bribery corporator sentenced to 5 years imprisonment | मीरा-भाईंदरच्या भाजपच्या लाचखोर नगरसेविकेला ५ वर्षांचा सश्रम कारावास

मीरा-भाईंदरच्या भाजपच्या लाचखोर नगरसेविकेला ५ वर्षांचा सश्रम कारावास

Next

मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेतील भाजपाची नगरसेविका वर्षा गिरधर भानुशाली (४३) हिला बुधवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने २०१४ साली लाच घेताना अटक झाल्याच्या खटल्यात ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५ लाखांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी ६ महिने कारावास भोगावा लागणार आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावताच पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची रवानगी कारागृहात केली आहे. न्यायालयाने पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर पण कारवाई करा असे आदेश आयुक्तांना दिले आहेत. मीरा-भाईंदरच्या इतिहासात पहिल्यांदाच लाचखोर लोकप्रतिनिधीला शिक्षा झाल्याची ही घटना आहे.

वर्षा भानुशाली ही २००७ सालच्या पालिका निवडणुकीत पहिल्यांदाच भाईंदर पूर्वच्या नर्मदानगर - हनुमाननगर भागातून अपक्ष म्हणून नरेंद्र मेहतांसह पॅनल मध्ये निवडून आली होती. नंतर मेहतांसहतीने भाजपात प्रवेश केला. २०१२ सालच्या महापालिका निवडणुकीत ती भाजपाच्या तिकिटावर पुन्हा भार्इंदर पूर्व भागातून निवडून आली. तिला प्रभाग समिती सभापतीपद मिळाले. २०१४ मध्ये तिने भाईंदर पूर्वेच्या वीन केम कंपनीच्या गाळ्याची उंची वाढवण्याच्या कामासाठी एक लाख ६० हजार रुपयांची मागणी रेखा पारेख यांच्याकडे केली होती. पारखे यांच्या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणेने सापळा रचून ६ जून २०१४ रोजी रात्री पारेख यांच्या कडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारताना भार्इंदरच्या मॅक्सस मॉल समोरील जानकी हेरीटेज इमारतीतल्या राहत्या घरात रंगेहाथ पकडले होते. भार्इंदर पोलीस ठाण्यात ७ जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागास भार्इंदर फाटक येथील जनता सहकारी बँक शाखेच्या लॉकर मधून १० लाख रोख व ९४ तोळे सोन्याचे दागिने मिळाले. तर घरात पकडले त्यावेळी घरातील दागिने व रोख पुडके बांधून खाली टाकण्यात आले असता ते इमारतीचा रखवालदार घेऊन पळाल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.भाजपा नगरसेविकेला लाच घेताना पकडल्याच्या घटनेने खळबळ उडून टिकेची झोड उठली होती. परंतु, तसे असतानादेखील २०१७ सालच्या पालिका निवडणुकीत वर्षाला भार्इंदर पश्चिमेच्या प्रभाग २३ मधून भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली.

चार जणांच्या पॅनल मधून ती निवडूनदेखील आली. दरम्यान या लाच प्रकरणाच्या खटल्याचा निकाल बुधवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी दिला. लाच घेतल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून तिला ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५ लाखांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी ६ महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल. तसेच या प्रकरणात संबंधित महापालिका अधिकारी यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करावी, असे आदेश दिल्याची माहिती सरकारी वकिल वैभव कडू यांनी दिली.

सदर गुन्ह्याचा तपास हा तत्कालिन पोलीस निरीक्षक अशोक साळवे यांनी केला. सरकारी वकील म्हणून विवेक गणपत कडू यांनी काम पाहिले. वर्षा यांनी स्वत:च्या बचावासाठी महावीर जैन या साक्षीदारास ठेकेदार म्हणून उभे केले. त्यांनी तक्रारदार कडून घेतलेले ५० हजार हे ठेकेदारास कामाचे पैसे द्यायचे म्हणून घेतले होते असा बनाव केला होता. पण सरकारी वकिलांनी उलटतपासणीत तो बनाव न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. या घटनेने मीरा भार्इंदर मधील लाचेच्या गुन्ह्यातील आरोपी असणारे काही नगरसेवक व अधिकाराऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर भाजपाला मात्र चांगलाच धक्का बसला आहे.

वर्षाला शिक्षा तर मेहतांवर टांगती तलवार

वर्षा भानुशाली या आधी पासूनच नरेंद्र मेहतांच्या सहकारी समर्थक मानल्या जात. २००७ साली दोघे एपात्र म्हण्ूुन एकत्र पॅनल मधून निवडून आले. २०१४ मध्ये वर्षा यांना लाच घेताना पकडले व त्यात शिक्षा झाली. त्या आधी मेहतांना २००२ साली नगरसेवक असताना अनधिकृत बांधकाम प्रकरणी लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. पण अनेक वर्षे चाललेल्या खटल्यातून मेहता मात्र ठाणे न्यायालयातून सुटले. त्याला शासनाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून तेथे दावा सुरूअसून त्याची टांगती तलवार मेहतांवर आहे.

झपाटयाने वाढलेल्या मालमत्तेचे काय ?

मूळची गुजरातच्या मेहसाणा येथील वर्षा ही सामान्य घरातील गृहिणी आणि पती शिधावाटप दुकान चालवतात. पण २००७ साली नगरसेविका झाल्यावर वर्षाची संपत्ती झपाट्याने वाढली. २०१२ साली निवडणूक शपथपत्रात तिने स्वत:ची मालमत्ता १७ लाख ९० हजार दाखवली होती. मात्र, मॅक्सस मॉल समोरील जानकी हेरीटेज इमारतीतील आलिशान घर खरेदी केले. परंतु, सदर घराची किंमत केवळ ३ लाख २० हजारच दाखवली.

तर वसईच्या कोल्ही गावात १३ गुंठे जमीन खरेदी केली. लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतरदेखील मालमत्ता मात्र वाढत राहिली. २०१७ सालच्या पालिका निवडणूक शपथपत्रात वर्षाने स्वत:ची मालमत्ता तब्बल एक कोटी १० लाख दाखवली आहे. लाच घेताना पकडल्यानंतर लॉकरमध्ये सापडलेली संपत्ती आणि नगरसेवकपदाच्या कालवधीत झपाट्याने वाढलेली संपत्ती याचे काय ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
 

Web Title: Mira-Bhayander BJP's bribery corporator sentenced to 5 years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.