‘मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही’; सेवेत कायम करण्यासाठी प्रशिक्षणार्थींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:41 IST2025-10-13T13:41:30+5:302025-10-13T13:41:54+5:30
आठवडाभरात निर्णय घ्या अन्यथा ठाण्यातील नितीन कंपनीसमाेरील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी धडक देऊ, असा इशारा संघटनेने दिला होता.

‘मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही’; सेवेत कायम करण्यासाठी प्रशिक्षणार्थींचा इशारा
ठाणे : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून युवा वर्गाला हक्काच्या कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला. या योजनेंतर्गत ११ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. मात्र, नंतर हजारो प्रशिक्षणार्थी बेरोजगार बनले. याबाबत आठवडाभरात ठोस निर्णय घेतला नाही तर मंत्र्यांनाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहायक संघटनेने दिला आहे.
आठवडाभरात निर्णय घ्या अन्यथा ठाण्यातील नितीन कंपनीसमाेरील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी धडक देऊ, असा इशारा संघटनेने दिला होता. मात्र, परवानगी न मिळाल्याने रविवारी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर सकाळी ११ ते १ दरम्यान ३६ जिल्ह्यांतील हजारो प्रशिक्षणार्थींनी निदर्शने केली. यावेळी माेठ्या प्रमाणात पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात
आला हाेता.
कायमस्वरूपी रोजगार द्या, मानधन दुप्पट करा
दर महिना सहा हजार आणि हजार मानधन देण्यासोबतच सेवेत कायम करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, आंदोलने करूनही सरकारी आस्थापनांमध्ये काम केलेले एक लाख ७५ हजार प्रशिक्षणार्थी बेरोजगार बनले. मानधनात दुप्पट वाढ करा. अधिवेशनात रोजगाराची हमी देणारा कायदा करा आदी संघटनेच्या मागण्या आहेत.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न साेडविणार - शिंदे
याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील-चाकूरकर यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संघटनेचे कार्याध्यक्ष पाटील यांच्या शिष्टमंडळाची शनिवारी ठाण्यातील निवासस्थानी
भेट घेतली.