विवाहितेला घरात कोंडून विनयभंग करणाऱ्या युवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 22:46 IST2019-02-03T22:40:21+5:302019-02-03T22:46:01+5:30
घोडबंदर रोड, नागलाबंदर येथील एका २५ वर्षी विवाहितेच्या घरात शिरून विनयभंग करणा-या संतोष ऊर्फ ज्ञानू घुगरे (२८) याला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी अटक केली.

कासारवडवली पोलिसांची कारवाई
ठाणे : नागलाबंदर येथे राहणा-या एका पंचवीसवर्षीय विवाहितेच्या घरात शिरून विनयभंग करणा-या संतोष ऊर्फ ज्ञानू घुगरे (२८) याला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील नागलाबंदर येथे राहणारी ही महिला आणि संतोष हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी तिच्या घराजवळच वास्तव्याला आहे. तो नेहमीच तिला फोन करून भेटण्यासाठी गळ घालत होता. तिने त्याला भेटण्यास नकार दिला होता. तरीही, त्याने १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पाठलाग करून तिच्या घरात शिरकाव करून तिचा विनयभंग केला. तिचा पती आल्यानंतर मागील खिडकीतून त्याने पलायन केले. याप्रकरणी तिने पतीच्या मदतीने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, नासीर कुलकर्णी यांच्या पथकाने त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एस.एम. धाडवे अधिक तपास करत आहेत.