नात्याचा रक्तरंजित शेवट! ठाण्याहून अमृतसरला फिरायला गेलेल्या जोडप्याने संपवले जीवन, पत्नीचा मृतदेह हॉटेलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 21:18 IST2025-12-09T21:09:22+5:302025-12-09T21:18:01+5:30
ठाण्यातील जोडप्याने पंजामध्ये जाऊन स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नात्याचा रक्तरंजित शेवट! ठाण्याहून अमृतसरला फिरायला गेलेल्या जोडप्याने संपवले जीवन, पत्नीचा मृतदेह हॉटेलमध्ये
Punjab Crime: महाराष्ट्रातील ठाणे येथून पंजाबमधील अमृतसर येथे पर्यटनासाठी गेलेल्या एका विवाहित जोडप्याच्या आयुष्याचा अत्यंत भयानक आणि दुःखद शेवट झाला आहे. पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून पतीने आधी पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः धावत्या ट्रकखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे ठाण्यासह अमृतसरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
धर्मशाला ठरली हत्या आणि आत्महत्येची साक्षीदार
ठाणे येथील रहिवासी सरिता सोनकर (वय ३८) आणि तिचा पती गणेश सोनकर अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे दोन दिवसांपूर्वी अमृतसर येथे आले होते आणि रेल्वे स्टेशनजवळील एका धर्मशाळेत थांबले होते. धर्मशाळेतील कर्मचाऱ्यांनी रात्री १० वाजता नियमित तपासणीसाठी या जोडप्याच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अनेकवेळा आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत खोलीचा दरवाजा तोडला. आतमध्ये सरिता सोनकर यांचा मृतदेह पलंगावर आढळला. त्यांच्या गळ्यावर खुणा असल्याने त्यांची गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. यावेळी त्यांचा पती गणेश सोनकर घटनास्थळावरून फरार होता.
पतीनेही संपवली जीवनयात्रा
पत्नीची हत्या केल्यानंतर फरार झालेला पती गणेश सोनकर याने मंगळवारी संध्याकाळी जंडियाला येथे रस्त्यावर एक भयानक कृत्य केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सोनकर रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याचवेळी एक ट्रक जवळून जात असताना त्याने अचानक धावत्या ट्रकखाली उडी मारली. या अपघातात गणेश सोनकर गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहाजवळ मिळालेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली.
कौटुंबिक वादातून घडला भयानक प्रकार
प्राथमिक तपासात हे संपूर्ण प्रकरण कौटुंबिक वादातून घडले असल्याचे पोलिसांना वाटते. किरकोळ वाद विकोपाला जाऊन त्याने इतके भयानक रूप घेतले, ज्यामुळे दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. सिव्हिल लाईनचे ठाणे अंमलदार गुरप्रीत सिंह यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे प्रकरण घरगुती वादाचे दिसत आहे. सरिता आणि गणेश या दोघांचे मृतदेह अमृतसरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांनी मृतकांच्या कुटुंबियांना माहिती दिली असून, त्यांचे कुटुंबीय आज रात्री अमृतसरला पोहोचण्याची शक्यता आहे. कुटुंबियांच्या जबाब आणि पुढील तपासानंतरच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.