१० लाखांच्या खंडणीसाठी लूम मालकाची हत्या करणाऱ्यास यूपीतून २६ वर्षांनंतर अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: April 25, 2025 21:26 IST2025-04-25T21:25:39+5:302025-04-25T21:26:14+5:30
ठाण्याच्या मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाची कारवाई : वर्षभरापासून होती निगराणी

१० लाखांच्या खंडणीसाठी लूम मालकाची हत्या करणाऱ्यास यूपीतून २६ वर्षांनंतर अटक
ठाणे : दहा लाखांच्या खंडणीसाठी जिगर मेहता (२७) या भिवंडीतील लूम मालकाची २६ वर्षांपूर्वी हत्या करणाऱ्या विनोदकुमार गुप्ता (४९) याला उत्तर प्रदेशातील परसाहेतिम गावातून नाट्यपूर्णरीत्या अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी दिली. गुप्ताने त्याच्या मूळ गावाजवळच मेडिकल शॉप थाटले होते. तब्बल एक वर्षे पोलिसांनी गुप्ता भोवती सापळा रचला होता, अशी माहिती ठाण्याच्या मध्यवर्ती शोध पथकाने दिली.
भिवंडीतील चारवलीच्या शेतामध्ये जिगर यांची २९ मे १९९९ रोजी हत्या झाली हाेती. भिवंडी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला हाेता. यातील तीनपैकी कमलेश उपाध्याय याला यापूर्वीच अटक झाली होती. विनाेदकुमार तेव्हापासूनच पसार हाेता. त्याच्यावर मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे हवालदार दादासाहेब पाटील हे यूपीतील काही खबरे आणि विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) मदतीने गेल्या वर्षभरापासून लक्ष ठेवून हाेते. यूपीतील गुप्ताच्या मूळ गावाजवळ त्याने चंदा मेडिकल शॉप सुरू केल्याची माहिती हवालदार पाटील यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पाटील, हवालदार दादा पाटील, अंमलदार दिनकर सावंत आणि मयूर शिरसाट आदींच्या पथकाने यूपीमध्ये जाऊन गोरखपूर एसटीएफच्या मदतीने २२ एप्रिल २०२५ रोजी सिद्धार्थनगर भागातून विनाेदकुमारला अटक केली.
काय घडला हाेता प्रकार-
जिगरच्या पॉवरलूममध्ये राजू मेहता ऊर्फ बिशनसिंग सावत हा काम करीत हाेता. राजूने त्याचा मित्र विनोदकुमार आणि यापूर्वी अटक केलेला कमलेश उपाध्याय यांनी कट रचून २८ मे १९९९ राेजी रात्री कारखान्यातील वीजपुरवठा खंडित केला. ताे सुरू करण्यासाठी जिगरला बाेलवून या त्रिकुटाने मारहाण केली. विनोदकुमारने इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून जिगरच्या अंगावरील दागिने आणि खिशातील राेकड काढून घेतली. त्यानंतर राजूने सुरीने गळा कापून त्याची हत्या केली. त्याच्याच स्कूटरने मृतदेह ठाकुरपाडा-सरवली शिवारातील एका शेतात टाकला. हत्येनंतर आराेपींनी जिगरच्या घरी एसटीडी बुथवरून २९ मे राेजी सकाळी ६:१५ च्या सुमारास फोन करून त्याच्या अपहरणाची माहिती दिली. त्याच्या सुटकेसाठी दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याला ठार मारण्याची धमकीही दिली. विनोदकुमारने बीईएमएस (बॅचलर ऑफ इलेक्ट्राे- हाेमिओपॅथी मेडिसिन ॲन्ड सर्जरी) चे मुंबईतील काॅलेजमधून शिक्षण घेतले हाेते. खुनानंतर तो मुंबईतून रेल्वेने पळून कधी मूळ गावी, तर कधी दिल्लीमध्ये मोबाइल जवळ न बाळगता राहत होता.
अशी झाली अटक-
पाेलिस मागावर नसल्याची खात्री झाल्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये त्याने मूळ गावालगत हिसामुद्दीनपूर येथे मेडिकल स्टोअर्स सुरू केले. दाेन दिवसांच्या टेहळणीनंतर २२ एप्रिल राेजी ठाणे पाेलिसांनी विनाेदकुमारला अटक केली.