बिहारच्या छपरामधून चरसची तस्करी करणाऱ्यास ठाण्यातून जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:19 IST2025-07-01T18:19:25+5:302025-07-01T18:19:42+5:30
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: ३० लाखांचा चरस हस्तगत

बिहारच्या छपरामधून चरसची तस्करी करणाऱ्यास ठाण्यातून जेरबंद
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: बिहारच्या छपरा भागातून चरसची तस्करी करणाऱ्या मोहंमद आफताब सलीम अखतर (वय-३४, रा. बबनगाव, जि. छपरा, बिहार) याला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी दिली. त्याच्या ताब्यातून ३० लाख ९६ हजारांच्या तीन किलाे ९६ ग्रॅम वजनाच्या चरससह ३१ लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ठाण्यातील काेपरी भागात गिऱ्हाईकांना चरसची विक्री करण्यासाठी एक तस्कर येणार असल्याची माहिती एका खबऱ्याच्या मार्फतीने गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचचे वरिष्ठ पेालीस निरीक्षक सलील भाेसले यांना मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे ३० जून २०२५ राेजी ठाणे पूर्व भागातील रेल्वे स्टेशन लगतच्या सार्वजनिक रस्त्यावर चरसच्या विक्रीसाठी आलेल्या अखतर याला सहायक पाेलीस निरक्षक भूषण शिंदे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये तीन किलाे ९६ ग्रॅम वजनाचा चरस आणि माेबाईल आणि राेकड असा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आराेपीला सात दिवस पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याचे आणखी काेण काेण साथीदार आहेत, चरस विक्रीसाठी ताे काेणाच्या संपर्कात हाेता, याचाही तपास सुरु आहे. सहायक पाेलीस निरीक्षक पल्लवी ढगे- पाटील या पुढील तपास करीत आहेत.