पाळीव प्राण्यांना मिळणार सन्मानपूर्वक 'निरोप'! राज्यातील पहिल्या स्मशानभूमीचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:27 IST2025-10-01T18:24:38+5:302025-10-01T18:27:11+5:30
Maharashtra first pet crematorium: ही स्मशानभूमी म्हणजे प्राणीप्रेमींसाठी एक दिलासा आणि आदर्शवत अशी सुविधा

पाळीव प्राण्यांना मिळणार सन्मानपूर्वक 'निरोप'! राज्यातील पहिल्या स्मशानभूमीचे लोकार्पण
Maharashtra first pet crematorium : पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची व्यवस्था आता प्रत्यक्षात आली आहे. पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या स्मशानभूमीचे म्हणजेचे मिरा भाईंदरमधील नवघर स्मशानभूमीचे लोकार्पण मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीची समस्या गंभीर आहे. आतापर्यंत पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह नदी-नाले, खाडीकिनारा, गटारे, कचरा कुंडी किंवा लांब खुल्या ठिकाणी टाकले जात होते. त्यामुळे दुर्गंध आणि रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होत होता. तसेच आरोग्याच्या समस्या पसरण्याचे प्रमाणही वाढत होते. राज्यात कुठेही पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीची सुसज्ज सुविधा नव्हती. परंतु आता ही स्मशानभूमी म्हणजे प्राणीप्रेमींसाठी एक दिलासा आणि आदर्शवत अशी सुविधा असणार आहे.
पाळीव प्राणी गॅस शवदाहिनी
नवघर स्मशानभूमी येथे साकारण्यात आलेली पाळीव प्राण्यांची शवदाहिनी ही पूर्णपणे गॅस शवदाहिनी असणार आहे. ही एक पर्यावरणपूरक सुविधा असून प्राण्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी नैसर्गिक वायू आणि प्रोपेन (LPG) चा वापर या शवदाहिनीमध्ये केला जातो. या प्रक्रियेमुळे मृतदेहाचे मुलभूत रासायनिक संयुगामध्ये रुपांतर होते. पाळीव प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या शवदाहिनीमुळे लाकूड जाळून होणारे प्रदूषण देखील रोखले जाईल.
दुसऱ्या स्मशानभूमीचेही लवकरच लोकार्पण
मिरा-भाईंदर शहरात नवघर आणि काशिमिरा येथे अशा दोन ठिकाणी पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. ज्यातील पहिल्या म्हणजेच नवघर स्मशानभूमीचे लोकार्पण झाले आहे. लवकरच दुसऱ्या म्हणजे काशिमिरा येथील स्मशानभूमीचे हि लोकार्पण केले जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लोकार्पणानंतर मिरा-भाईंदर शहरात प्राणीप्रेमी नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, पर्यावरण संवर्धन आणि प्राण्यांप्रति असलेली आपुलकी या दोन्ही गोष्टींचा संगम साधल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येता आहे.