Maharashtra Election 2019: शिवसेनेचं पुन्हा गुजराती प्रेम; एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर मराठी भाषिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 09:58 AM2019-10-19T09:58:49+5:302019-10-19T09:59:33+5:30

एकीकडे काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका गुजराती व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली होती

Maharashtra Election 2019: Shiv Sena's Gujarati love again Marathi-speaking angry at Eknath Shinde's advertisement | Maharashtra Election 2019: शिवसेनेचं पुन्हा गुजराती प्रेम; एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर मराठी भाषिक संतप्त

Maharashtra Election 2019: शिवसेनेचं पुन्हा गुजराती प्रेम; एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर मराठी भाषिक संतप्त

Next

ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पेटला जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात केम छो वरळी असे गुजराती भाषेतले पोस्टर्स झळकावले होते. त्यावरुन अनेकांनी शिवसेनेवर संताप व्यक्त केला होता. अशातच आता ठाणे येथील पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुजराती भाषेत जाहिरात केलेला व्हिडीओ पोस्ट केल्याने अनेक मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेना या आक्रमक संघटनेची स्थापना केली होती. मात्र कालांतराने मराठीचा मुद्दा बाजूला सारत शिवसेनेने हिंदुत्व हाती घेतलं. सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध गुजराती असा वाद रंगला जात असतानाच शिवसेनेचे गुजराती प्रेम उफाळून आल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी बोरिवली ते ठाणे या भूयारी मार्गाचं काम करणार असल्याची जाहिरात केली. 

या जाहिरातीत मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा गुजराती भाषेत बोलत असताना दिसत आहे. बोरिवली ते ठाणे भुयारी मार्गामुळे ठाण्यातून बोरिवलीत जाण्यासाठी कमी वेळ लागेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे गुजराती भाषिकांच्या मतांसाठी एकनाथ शिंदेंनी ही जाहिरात केल्याचं सांगितलं जात आहे. 

एकीकडे काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका गुजराती व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली होती. क्षुल्लक कारणावरुन  हसमुख शहा पिता-पुत्राने पैठणकर कुटुंबाला मारहाण केली होती त्यानंतर मनसेचे अविनाश जाधव यांनी हसमुख शहाला मनसे स्टाईल धडा शिकविला होता. त्यानंतर हसमुख शहाने या प्रकरणावर माफी मागितली होती. या संपूर्ण प्रकारामुळे ठाण्यात गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटला होता. त्यावेळी शिवसेनेवर या प्रकरणावर मौन बाळगलं होतं. 

निवडणुकीच्या काळात पुन्हा एकदा शिवसेनेने गुजराती मतांना जवळ करण्यासाठी अशाप्रकारे जाहिरात केल्याचं बोललं जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील गुजराती बॅनरमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीमुळे मराठी भाषिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी भाषेचा मुद्दा पुढे करुन मेट्रोच्या निमित्ताने मराठी अस्तित्व संपविण्याचा घाट घातला जातोय असा आरोपही मुंबईतील भाषणात केला होता. 

Web Title: Maharashtra Election 2019: Shiv Sena's Gujarati love again Marathi-speaking angry at Eknath Shinde's advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.