सूर्यग्रहणाचा लुटला आनंद, ‘अंनिस’चा डोंबिवलीमध्ये उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:31 AM2019-12-27T00:31:43+5:302019-12-27T00:32:03+5:30

‘अंनिस’चा डोंबिवलीमध्ये उपक्रम : ढगाळ वातावरण बदलल्यानंतर दिसले ग्रहण

The Lost Bliss of Solar Eclipse, 'Annis' Dombivali's Activities | सूर्यग्रहणाचा लुटला आनंद, ‘अंनिस’चा डोंबिवलीमध्ये उपक्रम

सूर्यग्रहणाचा लुटला आनंद, ‘अंनिस’चा डोंबिवलीमध्ये उपक्रम

Next

डोंबिवली : कंकणाकृती सूर्यग्रहण तब्बल १० वर्षांनी गुरुवारी दिसणार असल्याने ते पाहण्यासाठी सकाळपासूनच शहरातील खगोलप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. त्यासाठी पश्चिमेतील भागशाळा मैदानासह विविध ठिकाणी त्यांनी गर्दी केली होती. सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे ग्रहण दिसत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला. मात्र, अखेर सकाळी ९ वाजता ग्रहण दिसल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

महाराष्ट्र अंनिसच्या डोंबिवली शाखेने ‘सूर्योत्सव’अंतर्गत भागशाळा मैदानात हे ग्रहण पाहण्याची संधी विनामूल्य नागरिकांना उपलब्ध करून दिली होती. २००९ नंतर असे सूर्यग्रहण प्रथमच दिसत असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता होती. अंनिसने ग्रहण पाहण्यासाठी ५० चष्म्यांची व्यवस्था केली होती. अंनिसने अनेक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण पाहण्यास यावे, अशी जागृती केल्याने शहरातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर परिसरातील महिलाही मुलांना सूर्यग्रहण दाखविण्यासाठी घेऊन आल्या होत्या. अंदाजे दीड हजार नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद येथे घेतला.
अंनिसचे सांस्कृतिक विभागाचे राज्य सचिव एस.एस. शिंदे यांनी ग्रहणाबाबत समाजात असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. भागशाळा मैदानात सूर्यग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ, सूर्यग्रहण सौरचष्म्यातून पाहा, अशी माहिती देणारे अनेक फलक लावले होते. यावेळी संस्थेचे एस.एस. जोशी, मुकुंद देसाई, किशोरी गरूड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
जोशी यांनी सांगितले, ‘सूर्यग्रहण हा सावल्यांचा खेळ असतो. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आल्यामुळे आणि चंद्र हा सूर्य व पृथ्वी यामध्ये येतो. त्यामुळे सूर्याचे किरण चंद्रामुळे अडले जातात. पृथ्वीवर आपण उभे असतो. त्यामुळे सूर्यबिंब दिसू शकत नाही. आजचे सूर्यग्रहण हे केरळ व कर्नाटक राज्यांत कंकणाकृती असून इतरत्र म्हणजेच उत्तर भारतात खंडग्रासकृती असे आहे. दरम्यान, ग्रहणाबाबत आजही आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी सूर्योत्सव हा उपक्रम आम्ही येथे राबवला आहे.’

केरळमध्ये पाहिले ग्रहण : सूर्यग्रहण म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार आहे. गुरुवारी संपूर्ण भारतात खंडग्रास सूर्यग्रहण होते. परंतु, केवळ केरळलगतच्या काही गावांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार होते. त्यामुळे केन्नूर येथे जाऊन आम्ही ग्रहण पाहिल्याचे आकाशमित्र मंडळाचे अध्यक्ष हेमंत मोने यांनी सांगितले. मंडळाने गुरुवारचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी केरळ येथे सहलीचे आयोजन केले होते. या संस्थेशी जोडलेले आणि खगोलप्रेमी असे ७७ जण या सहलीत सहभागी झाले होते. १९८० पासून संस्थेच्या सदस्यांनी विविध प्रदेशांत जाऊन सूर्यग्रहण पाहिले होते. यंदाची त्यांचीही सहावी वेळ होती. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे खगोलप्रेमींचा हिरमोड झाल्याचे समजले. पण आम्हाला सुंदर असे कंकणाकृती ग्रहण पाहता आले. ग्रहण हा कधीही रद्द न होणारा असा प्रयोग आहे, असेही मोने यांनी सांगितले.

नवी मुंबईतील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकणारा ईशान आपटे हा नाताळच्या सुटीत डोंबिवलीत आजीकडे आला होता. यापूर्वी त्याने कधी ही सूर्यग्रहण पाहिले नव्हते. त्यामुळे ग्रहणाबाबत त्याच्या मनात कुतूहल होते. डोंबिवलीतील दुकानांमध्ये त्याला कुठेही सौरचष्मे न मिळाल्याने त्याने गुरुवारी भागशाळा मैदानात हजेरी लावली. तेथे ग्रहण पाहण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली. त्याचबरोबर बँकेतील कर्मचारी अनिश कदम यांनी बँकेत थोडे उशिरा जात ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. अर्चना देशमुख म्हणाल्या, मुलींना सूर्यग्रहण दाखविण्यासाठी आम्ही मैदानात आलो आहे. मागचे सूर्यग्रहण ही आम्ही पाहिले होते. तर, अस्मी देशमुख म्हणाली, अभ्यासक्रमात ग्रहणाचा धडा आहे. पण आज ग्रहण प्रत्यक्षात अनुभवता आले, त्यांचा आनंद वाटतो.

गणेश मंदिरात पाळल्या प्रथा
श्री गणेश मंदिर संस्थानात सूर्यग्रहण काळात देवांना गुलाबी रंगाच्या कपड्यांनी झाकून ठेवले होते. ग्रहण काळ संपत आल्यावर देवांना स्नान घालण्यात आले. त्यानंतर, मंत्रपठण करण्यात आले. संस्थानच्या उपाध्यक्षा अलका मुतालिक म्हणाल्या, ‘ग्रहणकाळात काही गोष्टी पाळाव्यात किंवा नाही, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे. आपण पूर्वापार चालत आलेल्या परंपरा नेहमीच पाळतो. त्या परंपरा मानवहितासाठी चांगल्या असतील, तर पाळायला काय हरकत आहे.’
 

Web Title: The Lost Bliss of Solar Eclipse, 'Annis' Dombivali's Activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.