Maharashtra Election 2019: सुशिक्षित मतदारांची मतदानाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 01:55 AM2019-10-23T01:55:03+5:302019-10-23T06:22:17+5:30

नागरी प्रश्न न सुटल्याने प्रचंड नाराजी

Lessons for educated voters | Maharashtra Election 2019: सुशिक्षित मतदारांची मतदानाकडे पाठ

Maharashtra Election 2019: सुशिक्षित मतदारांची मतदानाकडे पाठ

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेने करूनही डोंबिवली मतदारसंघात जेमतेम ४०.७२ टक्के मतदान झाल्याने सुशिक्षित मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले. २०१४ विधानसभा निवडणुकीत तीन लाख ३८ हजार ३३० मतदारांपैकी एक लाख ५१ हजार ३१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी ४४.७४ टक्के मतदान झाले होते. तेव्हाच्या तुलनेत यंदा १७ हजार ६८८ मतदार वाढले. परंतु, तीन लाख ५६ हजार १० मतदारांपैकी एक लाख ४४ हजार ९८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ च्या तुलनेत यंदा ४.०२ टक्के मतदानात घट नोंदवली गेली आहे.

२०१४ मध्ये युती, आघाडी नव्हती. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि मनसे, बसपा, अपक्ष असे सर्वच पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. त्या तुलनेत यावेळेस महायुती आणि महाआघाडी होती. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल, असे सर्व पक्षांना वाटले होते. पण सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या अपेक्षेवर मात्र पाणी फिरवले गेले.

सर्व पक्षांनी शहरातील विदारक स्थितीविरोधात सडकून टीका केली होती. त्यात मनसे आघाडीवर होती. काँग्रेस, राष्ट्रवादीने उघडपणे टीका केलेली नसली तरीही चर्चेतून डोंबिवलीकरांची व्यथा मांडली होती. मनसे, काँग्रेसने चौक सभांमधून शहरातील खड्डे, कचरा, फेरीवाले, अरुंद रस्ते, वाहतूक व पूलकोंडी अशा असंख्य प्रश्नांवर टीका केली होती. दुसरीकडे भाजपच्या चौक सभांमध्ये व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी शहरातील सकारात्मकता मांडली. मात्र काही प्रमाणात विरोधी पक्षांनी नाके मुरडली. तर, काहींनी शेवडे यांना थेट फोन करून नाराजी व्यक्त केली होती.

डोंबिवलीत ब्राह्मण मतदार मोठ्या संख्येने असल्याने ब्राह्मण कार्ड चालवण्याचा प्रयत्न मनसेने केला. निवडणुकीपूर्वी भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी शहरातील ब्राह्मण महासंघ संचलित वेदपाठ शाळेचे उद्घाटन केले होते. त्यावर मनसेने आक्षेप घेतला होता. त्यामुळेही या निवडणुकीला वेगळे वळण आले होते. त्यावरून झालेल्या टीका, टिपण्णीमुळे ब्राह्मण मतदारांनी काही भागात मतदानाला जाणेच टाळल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. ब्राह्मण कार्डची चर्चा झाल्यानंतर अन्य समाजांनीही बैठका घेत काही निर्णय घेतले.

सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा रंगली होती. शहरातील खराब रस्ते, खड्डे तसेच शहरात विकासकामे न झाल्याने नागरिक नाराज होते. बंद झालेल्या कोपर उड्डाणपुलामुळे होऊ लागलेल्या वाहतूककोंडी नागरिक नाराज होते. अशा सगळ्या स्थितीमुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरू आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कल्याण ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या डोंबिवली पूर्वेतील डीएनसी शाळेच्या प्रांगणात झाली होती. त्यावेळी त्यांनीही मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते. दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसने येथे एकही मोठा नेता प्रचाराला आणला नव्हता. भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण पट्यातील ३९ विधानसभांच्या प्रचाराची जबाबदारी दिली होती.

याद्यांच्या घोळांमुळेही मतदार संतप्त

सुशिक्षितांचे शहर, अशी डोंबिवलीची ख्याती असली तरीही अनेक ठिकाणी याद्यांचे घोळ लोकसभा निवडणुकीप्रमाणेच सुरू होते. यादीत नाव नसणे, नाव गहाळ होणे, केंद्रांची अदलाबदल होणे, अशा प्रकारांमुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. डोंबिवलीतून अन्यत्र स्थलांतरित झालेल्यांची नावे नेहमीप्रमाणे यादीत होती. अशा नागरिकांनी आपली नावे रद्द न केल्याने याद्यांमध्ये फुगवटा आल्याचे निदर्शनास आले. निवडणूक आयोगाने या सगळ्या बाबी लक्षात घेऊन अद्ययावत याद्या तयार करणे अत्यावश्यक आहे. राजकीय पक्षाने त्याकडे लक्ष दिले नसल्याची खंत नागरिकांमध्ये होती.

Web Title: Lessons for educated voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.