वकील फरहान अन्सारी ठरले देवदूत; ऑक्सिजनचे ३५ सिलिंडर्स बाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 23:37 IST2021-04-28T23:36:52+5:302021-04-28T23:37:07+5:30
भावासह गाठले रुग्णालय : ऑक्सिजनचे ३५ सिलिंडर्स बाहेर काढले

वकील फरहान अन्सारी ठरले देवदूत; ऑक्सिजनचे ३५ सिलिंडर्स बाहेर काढले
ठाणे : मुंब्य्रातील प्राइम क्रिटिकेअर केअर रुग्णालयाला बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु, यामध्येही मुंब्य्रातील ॲड. फरहान अन्सारी हे देवदूत ठरले आहेत.
रुग्णालयाजवळ राहणारे अन्सारी रमजान असल्याने पहाटे नमाज अदा करण्यासाठी उठले असता त्यांनी आपल्या घराच्या खिडकीतून रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या लाटा पाहून तातडीने आपल्या भावासह रुग्णालय गाठून वॉर्डमधील खिडकीचे ग्रील रॉडने तोडून ९ रुग्णांना तातडीने बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला. त्याचबरोबर वाय इतर सहकाऱ्यांच्या सोबत रुग्णालयात असलेले ऑक्सिजनचे ३५ सिलिंडर्सदेखील बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळेच फरहान या रुग्णांसाठी रमजानच्या पवित्र महिन्यात देवदूत ठरले.
मुंब्य्रातील प्राइम केअर रुग्णालयाला पहाटे ३.४० च्या सुमारास शॉर्कसर्किटमुळे भीषण आग लागली. त्याच वेळेस अन्सारी हे नमाज अदा करण्यासाठी उठले होते. त्यावेळेस त्यांची नजर खिडकीसमोरील हॉस्पिटलकडे केली. त्यांनी लागलीच आपल्या भावांना सोबत घेऊन रुग्णालय गाठले. आतून आवाज येत होता, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, धुरांचे लोळ उडत होते. त्यामुळे काय करावे, रुग्णांना बाहेर कसे काढावे, असा प्रश्न त्याला सतावत होता. परंतु, क्षणाचाही विचार न करता त्यांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस वॉर्डमधील भिंतीच्या खिडकीचे ग्रील तोडून सुरुवातीला तीन रुग्णांना बाहेर काढले. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आणखी पाच जणांना त्यांनी बाहेर काढले. मात्र, सर्व या घटनेमुळे रुग्ण घाबरलेले होते, धुरामुळे त्यांना दम लागत होता, श्वास कोंडला होता. त्यामुळे त्यांना बाहेर काढणे हाच आमचा विचार सुरू होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.