जव्हार शहरात घाणीचे साम्राज्य; अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 23:51 IST2021-05-07T23:50:22+5:302021-05-07T23:51:25+5:30
पावसाळ्यापूर्वीची कामे कशी हाेणार?

जव्हार शहरात घाणीचे साम्राज्य; अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ताण
जव्हार : कोरोनाकाळात जव्हार शहराच्या स्वच्छता योजनेवर सरकारी संकट कोसळले आहे. निधीअभावी कर्मचारी कमी केल्यामुळे नगर परिषदेवरील सफाईचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वच्छ शहर, सुंदर शहर अशी ओळख असलेल्या जव्हार शहरात ठिकठिकाणी व गल्लीबोळांत घाणीचे साम्राज्य दिसत असून, स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. सफाई कामगारांची अपुरी संख्या असल्यामुळे शहराची नियमित सफाई हाेत नाही. कचऱ्याचे ढीग आणि तुंबलेल्या गटारी यांमुळे शहराला बकालावस्था आली आहे. पावसाळ्यापूर्वीची तयारी या काळात अपेक्षित असताना सफाई कामगारांचा तुटवडा यंदा शहरातील नागरिकांना भोवणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिका प्रशासन गर्दी कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. मात्र, स्वछतेकडे सपशेल दुर्लक्ष झाल्यामुळे यंदाचा पावसात गटारे, नाले तुंबण्याची शक्यता आहे. तसेच नवीन नळपाणी योजनेचे कामही सुरू आहे. त्यामुळे पाइप टाकण्यासाठी रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे उकरलेली मातीही कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे साऱ्या रस्त्यात पसरलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात तर संपूर्ण रस्त्यांवर चिखल होणार आहे, चिखलात वाहने सरकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, स्वच्छता नसल्यामुळे व कीटकनाशक फवारणी केली नसल्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया, कावीळ हे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहराच्या स्वच्छतेबाबत व फवारणीबाबत नगराध्यक्षांपासून नगरसेवकांपर्यंत कोणीही लक्ष घालताना दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधीच स्वच्छतेविषयी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे.
जव्हार शहरातील सफाईबाबत नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पूर्वी ३५ सफाई मजूर सफाईसाठी कामाला होते. मात्र, निधीअभावी मजुरांची संख्या कमी करून १५ करण्यात आली आहे. त्यामुळे
कामाचा ताण वाढला आहे. नगर परिषदेला स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या वित्त आयोगाकडून निधी दिला जात होता. स्वच्छतेचा वर्षाचा ठेका एक कोटी सहा लाखांचा होता. मात्र, या वर्षापासून हा निधी येणे बंद झाले आहे.
नगर परिषदेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. केवळ ५५ लाख रुपये स्वच्छतेसाठी शिल्लक आहेत. निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल.
- ॲड. प्रसन्ना भोईर,
नगरसेवक, जव्हार नगरपरिषद