अभियंता मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका

By जितेंद्र कालेकर | Published: October 14, 2021 10:58 PM2021-10-14T22:58:03+5:302021-10-14T23:09:54+5:30

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या अनंत करमुसे याअभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गुरु वारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली.

Jitendra Awhad arrested and released in engineer beating case | अभियंता मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका

दीड वर्षांपूर्वी झाली होती अनंत करमुसे यांना मारहाण

Next
ठळक मुद्दे दीड वर्षांपूर्वी झाली होती अनंत करमुसे यांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या अनंत करमुसे याअभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गुरु वारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्यांची दहा हजारांच्या जातमुचलक्यावर तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर ठाणे न्यायालयाने त्यांची ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास जामीनावर सुटका केली आहे.
स्थापत्य अभियंता करमुसे यांनी फेसबूकवर आव्हाड यांचा आक्षेपार्ह फोटो गतवर्षी व्हायरल केला होता. त्यानंतर काही पोलीस करमुसे यांच्या घरी पोहोचले. पोलीस ठाण्यात जायचे असल्याचे सांगून त्यांनी करमुसे यांना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले. तिथे आपणास १० ते १५ जणांनी पोलिसांच्या लाठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. हा प्रकार आव्हाडांच्या उपस्थितीत घडल्याचा आरोप करमुसे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. विरोधकांकडून दबाव आल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मुंबई सुरक्षा दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह १० ते १२ आरोपींना अटकही झाली होती. ५ एप्रिल २०२० मध्ये हा प्रकार घडला होता. याच गुन्ह्यात जितेंद्र आव्हाड गुरु वारी दुपारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी जबाब नोंदविल्यानंतर त्यांना ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायाधीश डी. डी. कोळपेकर यांनी त्यांची जामीनावर सुटका केली. दरम्यान, त्यांच्या सुटकेनंतर भाजपनं मात्र मंत्रिमंडळातून त्यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे.
* एकीकडे त्यांच्या हस्ते गुरुवारी म्हाडाच्या घरांची सोडत पार पडली असताना दुसरीकडे त्यांना अटक झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून समोर आणली. ठाणे पोलिसांकडून याबाबत अधिकृत कोणतीही माहिती उशिरापर्यंत देण्यात आली नाही. एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला.

Web Title: Jitendra Awhad arrested and released in engineer beating case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app