आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 06:21 IST2025-10-08T06:21:17+5:302025-10-08T06:21:29+5:30
आ. आव्हाड म्हणाले की, शासनातून आलेले अधिकारी ठाण्यातून परत जात नाहीत. त्यांना ठाण्यातले कोणते श्रीखंड-पुरीचे जेवण एवढे आवडते ?

आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेतील उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ लाखांची लाच घेताना अटक केल्यानंतर आता भाजप, शरद पवार गट आणि उद्धवसेनेने शिंदेसेनेला लक्ष्य केले आहे. २५ लाखांची लाच घेताना पकडलेला अधिकारी प्रमोशन घेतोच कसे, असा सवाल शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला असून भाजपचे आ. संजय केळकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
आ. आव्हाड म्हणाले की, शासनातून आलेले अधिकारी ठाण्यातून परत जात नाहीत. त्यांना ठाण्यातले कोणते श्रीखंड-पुरीचे जेवण एवढे आवडते ? नगरविकास विभागाने ठाणे महापालिकेतील पदोन्नती धोरणावर श्वेतपत्रिका काढली पाहिजे. महापालिकेत आवडीचे अधिकारी आवडीच्या पदांवर वर्षानुवर्षे बसवले जातात. आ. केळकर यांनी पाटोळे यांच्यावर सडकून टीका केली. केळकर म्हणाले की, ठाणे महापालिकेकडून कुणावर कारवाई झालीच नाही, ज्या कारवाया झाल्या त्या कोर्टाच्या आदेशाने झाल्या. परंतु अशा घटनांमुळे ठाणेकरांना मान खाली घालावी लागत आहे. काही अधिकारी, अशा पद्धतीने लुटमार करीत आहेत आणि काही जण त्यावर पांघरुण घालण्याचे काम करीत आहेत. तर काहीजण महापालिका ही स्वत:ची मालमत्ता असल्यासारखे वावरत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे फावले आहे. अधिकाऱ्यांना भीती राहिलेली नाही.
भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आका मंत्रिमंडळात आहे का?
उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे म्हणाले की, महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे ठाणेकरांना कंटाळा आला आहे. नगरविकास मंत्री ठाण्याचे असताना अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. एका अधिकाऱ्याला लाच घेतल्यामुळे अटक होते, त्यांचा आका मंत्रिमंडळात आहे का? असेल तर त्यावर मुख्यमंत्री कारवाई करतील का, असा सवाल दिघे यांनी केला.