भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर
By धीरज परब | Updated: October 4, 2025 20:53 IST2025-10-04T20:53:36+5:302025-10-04T20:53:53+5:30
Cyber Crime News: मीरारोडच्या दोघा तरुणांना थायलंड येथे फेसबुक मध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांना थायलंड वरून बेकायदा म्यानमार देशात नेऊन सायबर गुन्ह्यासाठी बळजबरीने राबवण्यात आले. तेथून सुटका करण्यासाठी त्यांच्या कडून खंडणी वसूल करण्यात आली.

भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर
- धीरज परब
मिरारोड - मीरारोडच्या दोघा तरुणांना थायलंड येथे फेसबुक मध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांना थायलंड वरून बेकायदा म्यानमार देशात नेऊन सायबर गुन्ह्यासाठी बळजबरीने राबवण्यात आले. तेथून सुटका करण्यासाठी त्यांच्या कडून खंडणी वसूल करण्यात आली. मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ने हे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणत दोघांना अटक केली असल्याची माहिती मिरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. ह्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार चीनचा आहे व अशा अनेक टोळ्या कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
थायलंड देशात फेसबुक कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष नया नगरच्या हैदरी चौक भागात राहणार आसिफ खान ऊर्फ नेपाळी याने नयानगर भागातील सय्यद इरतिझा हुसैन व अम्मार लकडावाला यांना दाखवले. ऑगस्ट २०२५ मध्ये आसिफ खान याने म्यानमार देशात असलेला त्याचा साथिदार अदनान शेख याच्या मदतीने दोघांना थायलंड येथे पाठवून दिले. हुसेन व लाकडावला यांना थायलंड मधील इतर साथीदारांच्या मदतीने बेकायदेशीरपणे म्यानमार या देशात सायबर गुलामगिरीकरीता मानवी तस्करी करून पाठवले. याची माहिती गोपनिय बातमीदारांमार्फत मीरा भाईंदर गुन्हे शाखा कक्ष १ ला मिळाली होती. पोलिस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे व पथकाने माहितीवरून म्यानमार मध्ये डांबून ठेवलेल्यांशी नमूद संपर्क साधला असता त्यांनी झालेल्या फसगत बद्दल सांगितले.
त्या दोघांना म्यानमार देशातील युयू८ या सायबर फ्रॉड करणाऱ्या कंपनीत लिओ या चिनी व स्टिव्ह आण्णा या भारतीयाने त्यांना भारतीय मुलींच्या नावाने बनावट फेसबुकवर खाते उघडून दिले. त्याद्वारे परदेशातील भारतीय लोकांशी फ्रेंडशिप करून त्यांचा व्हाटस्अप नंबर मिळवायचा व त्यांना विश्वासात घेवून क्रिप्टोकरन्सी व बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगून त्यांची फसवणूक करण्याचे काम करण्याचे प्रशिक्षण दिले. त्या नंतर त्यांना अशी अनेकांची फसवणूक करून सायबर गुन्हा करण्याच्या कामास भाग पाडले.
ह्या दोघांना कंपनीच्या इमारतीच्या बाहेर जाण्यास देखील बंदी घालण्यात आली होती. काम न केल्यास त्यांचा शारिरीक छळ केला. ह्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी आरोपीतांनी फसलेल्या दोघां कडून प्रत्येकी ७ हजार अमेरीकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनातील ६ लाख रुपये खंडणी म्हणून ५ भारतीय बँक खात्यांवर वसूल केली आहे. खंडणीची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांची म्यानमार देशातून मुक्तता केली गेली. मीरारोड मध्ये परत आल्या नंतर त्यांच्या फिर्यादीनुसार नयानगर पोलीस ठाण्यात ८ जणां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हयाच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेने एजंट आसिफ खान ऊर्फ नेपाळी ह्याला नयानगर मधून अटक केली आहे. खंडणीची रक्कम स्विकारणाऱ्या पैकी एक आरोपी रोहीत कुमार मरडाणा रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश ह्याला गुजरातच्या सुरत येथून अटक करण्यात आली आहे. त्याने सदरची रक्कम कुठे पाठविली तसेच अन्य आरोपींचा तपास सुरू आहे. ह्या रॅकेट मध्ये अनेक भारतीय तरुण अडकल्याचे सांगण्यात आले. आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहायक निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक उमेश भागवत सह अशोक पाटील, संजय शिंदे, पुष्पेंद्र थापा, मनोज चव्हाण, सचिन हुले, स्वप्निल मोहिले, प्रशांत विसपुते, गौरव बारी व धिरज मेंगाणे यांनी तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली.