Institutional officers of Mira Bhayander Municipal Corporation were finally transferred | मीरा भाईंदर महापालिकेतील संस्थानिक अधिकाऱ्यांची अखेर बदली   

मीरा भाईंदर महापालिकेतील संस्थानिक अधिकाऱ्यांची अखेर बदली   

मीरारोड - मीरा भाईंदर पालिकेच्या बांधकाम विभागात गेल्या २५  वर्षां पेक्षा जास्त काळ एकाच जागी तहान मांडून असणारे संस्थानिक मानले जाणारे वजनदार कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांची पाणी पुरवठा विभागात बदली करण्याचा धाडसी निर्णय आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी घेतला आहे . तर २०११ पासून पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता असलेले सुरेश वाकोडे यांना बांधकाम विभागात खांबित यांच्या जागी नेमण्यात आले आहे . 

मीरा भाईंदर नगरपरिषद असताना ९४ - ९५ दरम्यान ठेका पद्धतीने दीपक खांबित हे कनिष्ठ अभियंता म्हणून कामास लागले होते . १९९७ साली मात्र ठाणे औद्योगिक न्यायालयातून आदेश आणून ते कायम कर्मचारी म्हणून शिरले . तेव्हा पासून बांधकाम विभागातच ते उपअभियंता व २००७ साला पासून आजतागायत कार्यकारी अभियंता ह्या पदावर काम करत होते .
 
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी खंबीत यांची बदलीचे आदेश दिले होते . त्यावेळी त्यांची पाणीपुरवठा विभागात बदली केली गेली परंतु खांबित त्या विभागात हजरच झाले नाहीत . आणि काही दिवसातच त्यांनी बदली रद्द करून नाईक यांच्या नाकावर टिच्चून पुन्हा बांधकाम विभागाचा कारभार हाती घेतला . 

 २००८ साली नगरसेवक असलेले चंद्रकांत वैती यांनी खांबित विरोधात आघाडी उघडली व सेवेतून निलंबित करण्याचा ठराव केला होता . ठराव मंजूर झाला . परंतु नंतर पुढच्या सभेत काही नगरसेवकांनी काही नेत्यांच्या वरदहस्तने खांबित यांना पुन्हा सेवेत घेण्याचा ठराव केला होता . 

खांबित यांच्या बदली साठी अनेकांनी तक्रारी केल्या परंतु त्यांची बदली वा त्यांच्यावर कार्यवाही मात्र होतच नव्हती . कारण अनेक नगरसेवकांसह काही नेते व काही मंडळीं यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने खांबित विरोधात ब्र काढत नसल्याचे आरोप केले जात आहेत . 

त्यातच गुरुवारी आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी मात्र खांबित यांची बांधकाम विभागातून उचलबांगडी करून चांगलाच धक्का दिला आहे . तर २०११ पासून पाणी पुरवठा विभागात ठाण मांडून असणारे सुरेश वाकोडे यांना सुद्धा हटवून त्यांची बदली खांबित यांच्या जागी केली आहे . 

ह्या शिवाय प्रभाग समिती ५ चे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांना कर निर्धारक संकलक पदाचा कार्यभार दिला असून संजय दोंदे यांना हटवून त्यांना प्रभाग समिती १ चे प्रभाग अधिकारी केले आहे . उद्यान विभागाच्या हंसराज मेश्राम व नागेश वीरकर यांची देखील अदला बदल केली आहे .

Web Title: Institutional officers of Mira Bhayander Municipal Corporation were finally transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.