वारकरी भवनचे इंदुरीकर महाराजांच्या हस्ते लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 11:09 IST2025-11-01T11:08:36+5:302025-11-01T11:09:25+5:30
महाराजांच्या प्रबोधनपर कीर्तनाचा आनंद नागरिकांनी घेतला.

वारकरी भवनचे इंदुरीकर महाराजांच्या हस्ते लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर मधील पहिल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली वारकरी भवनचे शुक्रवारी सायंकाळी ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी महाराजांच्या प्रबोधनपर कीर्तनाचा आनंद नागरिकांनी घेतला.
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर काशिमीरा भागातील सुविधा भूखंडावर उभारण्यात आलेल्या ह्या २ मजली वारकरी भवनचे ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. लोकार्पण नंतर लता मंगेशकर नाट्यगृहात महाराजांचे कीर्तन झाले. वारकरी भवनच्या माध्यमातून समाज आध्यात्मा कडे झुकेल अशी भावना व्यक्त करत समाजप्रबोधनाचे हे मोठे कार्य मंत्री सरनाईक यांच्या हस्ते झाले आहे असे इंदुरीकर महाराज म्हणाले.
राज्यातील वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि लाखो लोकांच्या श्रद्धा - भक्तीची नाळ जुळलेली असलेल्या परंपरेचा वारसा मीरा भाईंदर सारख्या शहरात देखील खऱ्या अर्थाने जोपासला पाहिजे म्हणून वारकरी भवन उभारण्याची संकल्पना शासना कडे मांडली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिला होता असे मंत्री सरनाईक म्हणाले.
वारकरी संप्रदायाची सेवा, निवास आणि उपक्रमांसाठी एक स्थायी निवारा उभारण्याचा संकल्प आज पूर्ण झाला हि अतिशय आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे. ३ वर्षां पूर्वी ह्या वारकरी भवनचे भूमिपुजन देखील इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते झाले होते व आज लोकार्पण सुद्धा त्यांनीच केले हा भाग्याचा प्रसंग आहे असे ते म्हणाले.
मीरा भाईंदर मध्ये वारकरी संप्रदाय आणि देव विठ्ठलास मानणारा मोठा वर्ग आहे. वारकरी भवन मुळे ह्या ठिकाणी भजन - कीर्तन, प्रवचन साठी हक्काची जागा मिळणार आहे. कीर्तनकारांच्या निवासाची सुविधा येथे आहे. वारकरी संप्रदाय, संतांचे माहात्म्य आदीं बाबत माहिती व मार्गदशनपर उपक्रम राबवले जाणार आहेत.