लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : लसीकरण केल्यानंतर २८ दिवसांत रक्तदान करता येत नाही. त्यामुळे या काळात रक्ताची उणीव भासू नये यासाठी शहरातील विविध संस्थांनी शनिवार व रविवारी रक्तदान शिबिरे घेतली. त्यात एक हजाराहून अधिक रक्तदाते पुढे आले, त्यातून ८५०हून अधिक जणांनी रक्तदान केले.
डोंबिवली केमिस्ट असोसिएशन, तरुण मित्रमंडळ, भाजयुमो, विवेकानंद मंडळ आदी संस्थांनी रक्तदान शिबिरे घेतली. केमिस्ट असोसिएशनचे प्रकल्प प्रमुख नीलेश वाणी म्हणाले, कोरोनायोद्ध्यांची जबाबदारी अखंडितपणे पार पाडणाऱ्या डोंबिवली केमिस्ट असोसिएशनने अन्न व औषध प्रशासन (एफडीए), रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या सहकार्याने रोटरी भवन येथे घेतलेल्या रक्तदान शिबिरात १११ रक्तबाटल्या संकलित करण्यात आल्या. ब्रह्मविद्या, योगविद्याद्वारे आपण कोरोनावर नियंत्रण आणू शकतो आणि आपल्याला रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमासाठी उत्साह निर्माण होतो, असे प्रतिपादन यावेळी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केले. एफडीएचे साहाय्यक आयुक्त प्रवीण मुंदडा यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी आजच्या परिस्थितीत रक्ताची नितांत गरज होती, अशी शिबिरे प्रत्येक शहरांत गरजेची असल्याचे सांगितले.
भारत विकास परिषद, विवेकानंद सेवा मंडळ, भाजयुमो, व्योम संस्था यांनी संयुक्तरीत्या पूर्वेतील सर्वेश सभागृहात रविवारी रक्तदान शिबिर भरवले. चिदानंद रक्तपेढीच्या सहकार्याने झालेल्या या शिबिराला तरुणांनी रक्तदान केले. या शिबिरात २१७ रक्तदात्यांनी योगदान दिले.
तरुण मित्रमंडळाने मानपाडा रोड येथील सोहम हॉल येथे घेतलेल्या रक्तदान शिबिरात ५२७ जणांनी सहभाग घेतला. त्यात तरुणांसह ज्येष्ठ मंडळींची उपस्थिती उल्लेखनीय होती, अशी माहिती धवल देढिया यांनी दिली.
प्लाझ्मादानासाठी जनजागृती
- कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मा संकलन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे शिबिराच्या आयोजकांनी सांगितले. रक्तदान शिबिरांत याबाबत जनजागृती करण्यात आली. प्लाझ्मादात्यांची माहिती व मोबाइल क्रमांक संकलित करण्यावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
- कोविडमधून बरे झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मादानासाठी पुढे यायला हवे. ही काळाची गरज असून, कोविड रुग्णांना प्लाझ्मा जीवदान ठरतो. त्यामुळे प्लाझ्मादानासाठी त्यांचे प्रबोधन व्हायला हवे, असेही आवाहन करण्यात आले.
--------