पालघरजवळच्या खाडीत सहा-सात बगळे मृत अन् अर्धमेल्या अवस्थेत! संसर्ग की घातपात, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:16 IST2026-01-03T18:16:17+5:302026-01-03T18:16:55+5:30
दोषींविरोधात कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पालघरजवळच्या खाडीत सहा-सात बगळे मृत अन् अर्धमेल्या अवस्थेत! संसर्ग की घातपात, चर्चांना उधाण
हितेन नाईक, पालघर: सातपाटी शिरगाव दरम्यानच्या चुनाभट्टी खाडी पाणथळ क्षेत्रात बगळे आणि अन्य जातीचे काही पक्षी मृतावस्थेत तर काही अर्धमेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. हा मानवनिर्मित प्रकार आहे, संसर्ग आहे की काही घातपात आहे? ह्याचा शोध घेऊन दोषींविरोधात कारवाई करण्याची लेखी मागणी पर्यावरण प्रेमी आणि सिंधू सह्याद्री फाउंडेशनचे संचालक भूषण भोईर यांनी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्याकडे केली आहे.
पालघर तालुक्यातील शिरगाव (चुनाभट्टी) हा भाग एक पाणथळ भाग असून सातपाटी - मुरबे ह्या दुधखाडीला भरती आल्यावर हे प्रवाहित पाणी चुनाभट्टी भागात जमले जात होते.ह्या जमलेल्या भागात शिरगाव, धनसार येथील शेकडो स्थानिक लोक मासेमारी करीत होते.मात्र मध्यंतरीच्या काळात ह्या भागातील जमिनींची विक्री झाल्याने ह्या पाणथळ जमिनीवर मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात येऊन मोठ मोठी रहिवासी संकुले उभी राहिली आहेत.
शिरगाव येथील पर्यावरण प्रेमी अहमद नजीब खलिफा हे शनिवारी सकाळी रोजी भटकंती करीत चुनाभट्टी भागात फिरत असताना ६-७ बगळे आदी पक्षी मृतावस्थेत पडलेले तर काही ३- ४ पक्षी अर्धमेल्या अवस्थेत निपचित पडल्याचे दिसून आले.त्यांनी ह्या मृत पक्षांना एका ठिकाणी जमवून अर्धमेल्या अवस्थेतील पक्षांना जवळच्या एका झोपडीत आणून त्यांना कुत्री आणि अन्य प्राण्यांच्या पासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठेवल्याचे खलिफा ह्यांनी लोकमत ला सांगितले. काही लोक जमलेल्या पाण्यात कॅप्सूल मधून आणलेले रासायनिक द्रावण पाण्यात मिसळून पक्षांच्या शिकारीचा प्रयत्न करीत असल्याचे काही स्थानिकांनी आपल्याला सांगितल्याचे खलिफा यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बहुतांशी पाणथळ जागांवर अवैध्य रित्या घरघुती तसेच परिसरातील रासायनिक घनकचरा टाकला जातो ज्या मुळे विषारी रसायने पाण्यात मिसळत असून ज्या मुळे माश्यांचा मृत्यू होतो.हे मासे बगळ्यांनि खाल्ले असावे किंवा घरातील कचऱ्यात थायमेट, डीडीटी सारखे रासायनिक पदार्थ असावेत ज्या मुळे हे असे घडू शकते असा संशय प्रा.भोईर यांनी व्यक्त केला आहे. पाण्याचे नमुने घेतल्या शिवाय ठोस कारण सांगणे शक्य नाही. अशा प्रकारच्या जलप्रदूषणाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे कारण पुढे हेच पाणी जमिनीत मुरून त्याचे गंभीर परिणाम भूजल साठ्यावर होतात त्यातून मानवी जीवनालां मोठा धोका निर्माण होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.