ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 23:46 IST2025-10-02T23:44:21+5:302025-10-02T23:46:51+5:30
दहा चाकी वाहनांचाही समावेश

ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शहरात अवजड वाहनांमुळे हाेणारी काेंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने पुन्हा सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० या दरम्यान अवजड वाहनांसाठी ठाणे शहर पेालीस आयुक्तायात बंदी केली आहे. ठाण्याचे पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी हे आदेश गुरुवारी जारी केले. अत्यावश्यक सेवांसह जीवनावश्यक आणि नाशवंत वस्तू आदींच्या वाहनांना मात्र या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
आपल्या आदेशामध्ये आयुक्तांनी म्हटले आहे की, ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील मुख्य मार्गावर वाहतूक काेंडी हाेऊ नये तसेच वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी मुख्य मार्गावर दहा आणि त्यापेक्षा जास्त चाकांच्या या अवजड मालवाहू वाहनांना प्रवेश बंद केला आहे. काेपरीमध्ये मुंबई, नवी मुंबईकडून आनंदनगर चेक नाका मार्गे ठाणे शहरात येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना आनंदनगर चेक नाका येथे प्रवेश बंद केला. त्याचप्रमाणे कासारवडवलीतील मुंबई, विरार वसईकडून घाेडबंदर राेडच्या दिशेने येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना गायमुख घाट येथे प्रवेश बंद राहणार आहे.
वागळे इस्टेट विभागात माॅडेला चेक नाका, कळवा विभागात विटावा जकात नाका तर मुंब्रा विभागात शिळफाटा येथे बंद राहणार आहे. अशीच प्रवेश बंदी भिवंडीतील नारपाेली, पाराेळ फाटा, धामणगाव, कल्याणमधील म्हारळ, गांधारी चाैक तसेच विठ्ठलवाडी, काेळशेवाडी आणि अंबरनाथ येथे अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. याआधी वाहतूक शाखेचे पाेलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी तात्पूरत्या स्वरुपात अवजड वाहनांना बंदी केली हाेती. हीच बंदी आता पाेलीस आयुक्तांच्या आदेशाने कायम केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ऐन सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी हाेणाऱ्या वाहतूक काेंडीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.