कळवा रुग्णालयात हृदयरोग उपचार केंद्र; रुग्णालयाचा करणार कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 01:03 IST2021-01-28T01:02:51+5:302021-01-28T01:03:07+5:30
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, उपचार केंद्रामध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी हृदयासंबंधीच्या सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध आहेत.

कळवा रुग्णालयात हृदयरोग उपचार केंद्र; रुग्णालयाचा करणार कायापालट
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये हळूहळू जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत असून, काही दिवसांत त्याचा कायापालट करण्याची ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आनंद दिघे यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधून माजी महापौर व नगरसेविका मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने निर्माण केलेल्या हृदयरोग उपचार केंद्राचे लोकार्पण बुधवारी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र पाठक, उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, क्रीडा व समाज कल्याण व सांस्कृतिक कार्य समिती सभापती प्रियंका पाटील, आरोग्य परीक्षण व वैद्यकीय समिती अध्यक्ष निशा पाटील, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॅा. भीमराव जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा. मुरुडकर, प्लॅटिनम हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॅा. संजित पॅाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका पॉल आदी उपस्थित होते.
विनामूल्य सुविधा
उपचार केंद्रामध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी हृदयासंबंधीच्या सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध आहेत. यामध्ये टू डी ईकोपासून ते ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी, स्टेन्ट टाकणे, याशिवाय बायपास शस्त्रक्रियेसह तद्नुषंगिक विविध उपचार हे विनामूल्य दिले जाणार आहेत.
१०० बेड्सची योजना
महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अधीन असणाऱ्या नागरिकांना हे उपचार मोफत देण्यात येणार आहेत. तसेच अन्य नागरिकांना अतिशय नाममात्र दरात हृदयरोगासंबंधीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या रोग उपचार केंद्रामध्ये १०० बेड्सची योजना असून, यातील ७० बेड्स कार्यान्वित केले आहेत.