महानगरची गॅस वाहिनी फुटल्याने १२०० कुटुंबांना फटका, गॅस पुरवठा खंडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 22:54 IST2022-05-15T22:54:22+5:302022-05-15T22:54:34+5:30
दीड तास गॅस पुरवठा खंडीत: महानगर कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापनचे मदतकार्य

महानगरची गॅस वाहिनी फुटल्याने १२०० कुटुंबांना फटका, गॅस पुरवठा खंडीत
ठाणे: घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट भागातील विला ग्रँड सोसायटीच्या बाजूला असलेली महानगरची १२५ मिली मीटर व्यासाची गॅस वाहिनी फुटल्याची घटना रविवारी पावणे चारच्या सुमारास घडली. त्यामुळे या भागातील सुमारे १२०० कुटूंबांचा गॅस पुरवठा दीड तासांसाठी खंडीत केला होता. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा पुरवठा सुरळीत केल्याची माहिती महानगर गॅसचे ठाण्याचे व्यवस्थापक नितीन पेडणेकर यांनी सांगितले.
हिरानंदानी इस्टेट येथील ग्रँड सोसायटीच्या बाजूला असलेल्या हिरानंदानी कॉम्पलेक्सच्या नविन इमारतीचे बांधकाम सुरु असतांना ही महानगर गॅसची वाहिनी दुपारी ५.४० वाजण्याच्या सुमारास फुटली होती. ही माहिती मिळताच घटनास्थळी महानगर गॅसचे अधिकारी आणि कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या पथकांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. अवघ्या दीड तासांमध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर या भागाचा गॅस पुरवठाही पूर्ववत केला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणलाही दुखापत झालेली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.