खंडणीसह दरोडे टाकणारी नवी मुंबईतील टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:35 IST2019-12-18T22:26:30+5:302019-12-18T22:35:21+5:30

कळव्यात दरोडे टाकून नवी मुंबई परिसरात खंडणी उकळणाऱ्या अभिषेक सिंग याच्यासह नवी मुंबईतील पाच जणांच्या टोळीला ठाण्याच्या कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध कळव्यात जबरी चोरीचा तर नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

A gang of robber arrested from Navi Mumbai by Thane police | खंडणीसह दरोडे टाकणारी नवी मुंबईतील टोळी जेरबंद

कळवा पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्दे सोनसाखळीसह रोकड हस्तगत कळवा पोलिसांची कामगिरी नगरसेवकाच्या वाहनांचीही केली होती तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दरोडे टाकून खंडणीही उकळणा-या अभिषेक सिंग (२३, ईश्वरनगर, नवी मुंबई) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी तसेच दोन हजारांची रोकडही हस्तगत केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
कळव्यातील वाघोबानगर येथील रहिवासी चंद्रभान प्रजापती आणि त्यांचे मित्र किशनकुमार राणा हे दोघे वाघोबानगर येथील रस्त्याने ४ डिसेंबर २०१९ रोजी पायी जात होते. त्यावेळी चार जणांच्या एका टोळक्याने या दोघांनाही दगडाने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल आणि रोकड असा ३५ हजारांचा ऐवज जबरीने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अभिषेक यांच्यासह भरत जाधव (२५, रा. नवी मुंबई), आशुतोष पाटोळे (१९, रा. नवी मुंबई), परमेश्वर पाटोळे (१९, रा. नवी मुंबई) आणि अभिषेक आंबावकर (१९, रा. नवी मुंबई) या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांनी या जबरी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना १० डिसेंबर रोजी अटक केली. त्यांनी जबरीने चोरलेली सोनसाखळी आणि दोन हजारांची रोकडही हस्तगत केली. त्यांनी ४ डिसेंबर रोजी नवी मुंबईतील दिघा येथेही सुनीलकुमार दुबे यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. ती न दिल्याने त्यांना मारहाण करून त्यांना ठार मारण्याचीही धमकी दिल्याची बाब चौकशीत उघड झाली.
* नवी मुंबईच्या नगरसेवकाच्या वाहनांची तोडफोड
दिघा परिसरातील स्थानिक नगरसेवक विकास झंजाड आणि इतरांच्या वाहनांचीही त्यांनी तोडफोड केल्याचीही कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध रबाळे पोलीस ठाण्यात खंडणीचाही गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक के. पी. थोरात, एस. एस. आजगावकर, उपनिरीक्षक कवळे तसेच पोलीस हवालदार शहाजी एडके, माधव दराडे, दिनकर देसाई, पोलीस नाईक रविंद बिराडे, संदीप महाडीक, रमेश पाटील, राहूल शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल संतोष ढेबे, विकास साठे आणि समाधान माळी आदींनी ही कारवाई यशस्वी केली.

Web Title: A gang of robber arrested from Navi Mumbai by Thane police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.