जलवाहिनी टाकण्याच्या कामामध्ये हलगर्जी; सर्व्हिस रोडची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 12:10 AM2020-03-09T00:10:00+5:302020-03-09T00:10:07+5:30

वेल्फेअर असोसिएशनचे एमआयडीसीला पत्र

Galvanic The plight of the service road | जलवाहिनी टाकण्याच्या कामामध्ये हलगर्जी; सर्व्हिस रोडची दुर्दशा

जलवाहिनी टाकण्याच्या कामामध्ये हलगर्जी; सर्व्हिस रोडची दुर्दशा

Next

डोंबिवली : निवासी भागात एमआयडीसीकडून सध्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. सर्व्हिस रोडवर सुरू असलेल्या कामामध्ये हलगर्जी सुरू असल्याचा आरोप येथील डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे.

एमआयडीसीकडून नवीन जलवाहिन्या आणि पावसाळी गटार आणि छोटे नाले बांधण्याचे काम सध्या निवासी भागात सुरू आहेत. छोट्या जलवाहिन्यांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. दोन ते अडीच फूट व्यासाच्या जलवाहिन्या सर्व्हिस रोडवर जमिनीखालून टाकण्याचे काम सुरू आहे. जाणकारांच्या मते या वाहिन्या टाकताना त्यावर प्लास्टिक कोटिंग करणे गरजेचे आहे. तसेच वाहिन्या जमिनीखाली टाकताना त्याच्या खाली व बाजूला काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे; पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोटिंगचे काम सुरू झाले आहे.

जलवाहिन्यांच्या खालच्या काँक्रीटीकरणाकडे मात्र कानाडोळा झाला असल्याकडे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने लक्ष वेधले आहे.
सध्या सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे खणून त्यात जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. या कामामुळे हा रोड खोदण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर निवासी भागातील जे मोजके रस्ते एमआयडीसीकडून सुस्थितीत आणले होते. त्यापैकी एक असलेल्या सर्व्हिस रोडची या खोदकामांमुळे पुन्हा दुर्दशा झाली आहे. एमआयडीसीत जमिनी खालून महानगर गॅसच्या वाहिन्या टाकल्या आहेत. त्याच्याच बाजूला महावितरणच्या केबल आणि खासगी मोबाइल कंपन्यांच्याही केबल आहेत. जलवाहिन्या आणि गटार, नाले बांधकामासाठी खोदकाम करताना सरकारी आणि खासगी कंपन्यांचा एकमेकांशी समन्वय नसल्याने भविष्यात एखादी दुर्घटना घडून जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबतीत गांभीर्याने विचार करून उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

पाण्याची क्षमता न तपासता बांधणी
गटार आणि छोेटे नालेबांधणीचे काम सुरू आहे; पण पावसात पडणाऱ्या पाण्याची वहन क्षमता न तपासता काही ठिकाणी लहान तर काही ठिकाणी मोठ्या आकाराचे गटार आणि नाले बांधण्याचे काम चालू आहे. नाल्याच्या रुंदीत तसेच काँक्रीटच्या भिंतीतही कमी-अधिक जाडीचा फरक असल्याचे वेल्फेअर असोसिएशनचे म्हणणे आहे. दरवर्षी निवासी भागात पावसाळ्यात येणाºया पुराचा विचार ही कामे करताना केला गेला नसल्याचा आरोप असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी केला आहे.

Web Title: Galvanic The plight of the service road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.