ठाण्यात पूर्ववैमनस्यातून चौकडीची तरुणाला जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:52 IST2018-12-26T21:45:35+5:302018-12-26T21:52:44+5:30
क्षुल्लक कारणावरुन प्रदीप जयस्वाल याच्यासह त्याच्या साथीदारांनी अख्तर खान या तरुणाला लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी गांधीनगर भागात घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गांधीनगरमधील घटना
ठाणे : पूर्ववैमनस्यातून प्रदीप जयस्वाल, अमर जयस्वाल, छोटू मिश्रा आणि अजय भारद्वाज यांनी अख्तर अन्वर खान (२०, रा. गांधीनगर, ठाणे) याला लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वा.च्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.
अख्तर खान याचा प्रदीप जयस्वाल, अमर, छोटू आणि अजय यांच्याशी मंगळवारी रात्री वाहन चालवण्यावरून वाद झाला होता. तो रात्री मिटला होता. परंतु, प्रदीप याने त्याच्या साथीदारांसह बुधवारी सकाळी पुन्हा अख्तरला गांधीनगर मशिदीजवळ गाठून सळई आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यात अख्तरच्या डोक्याला, पाठीवर आणि पोटावर प्रहार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. याप्रकरणी आधी चितळसर पोलीस ठाण्यात अख्तरच्या नातेवाइकांनी तक्रार दिली. परंतु, हल्ल्याचे ठिकाण हे वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे हा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
......................