ठाण्यात सुरु झाले पहिले खासगी लसीकरण केंद्र; महापालिकेने दिली १०२ रुग्णालये, आस्थापनांना परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 17:28 IST2021-06-03T17:27:28+5:302021-06-03T17:28:30+5:30
Corona vaccination : लवकरच आणखी खासगी केंद्रेही होणार सुरू. पहिल्या दिवशी १०० नागरिकांचं लसीकरण

ठाण्यात सुरु झाले पहिले खासगी लसीकरण केंद्र; महापालिकेने दिली १०२ रुग्णालये, आस्थापनांना परवानगी
ठाणे : मागील काही दिवसापासून कोरोना लसीकरण केंद्र वाढविण्यावरुन आणि खाजगी लसीकरण केंद्र सुरु करण्याच्या मुद्यावरुन चर्चा सुरु होती. दरम्यान आता ठाण्यात पहिले खाजगी लसीकरण केंद्र सुरु झाले आहे. ठाण्यातील घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागात हे पहिले खाजगी लसीकरण केंद्र सुरु झाले असून येथे पहिल्याच दिवशी १०० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. परंतु यासाठी १ हजार रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे ठाणे महापालिकेने अशा प्रकारे शहरातील १०२ खाजगी रुग्णालये आणि इतरांना लसीकरण केंद्र सुरु करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. परंतु अनंत अडचणींचा सामना करुन ही लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यानंतर आता महापालिकेने खाजगी रुग्णालये, गृहसंकुले, उद्योग आदींच्या ठिकाणी लसीकरण मोहीम सुरु करण्यासाठी धोरण आखले होते. याच धोरणाअंतर्गत आता र्पयत पालिकेने १०२ खाजगी रुग्णालये आणि इतर आस्थापनांना लसीकरणाची परवानगी दिली असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. त्यानुसार ठाण्यातील गृहसंकुलात पहिले खाजगी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागात हे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून अर्पण फाऊंडेशनच्या माध्यमातून हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. यासाठी खाजगी रुग्णालयाची मदत घेण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनच्या प्रमुख भावना डुंबरे यांनी दिली.
१००० रूपये मोजावे लागणार
दरम्यान, या ठिकाणी पहिल्याच दिवशी १०० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. याठिकाणी लस घेणाऱ्यांसाठी १ हजार रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे या किमीतीवरुन भविष्यात वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खाजगी रुग्णालयांना लसींच्या किमंती ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु हे दर सर्व खाजगी रुग्णालयांच्या ठिकाणी एकच असावेत अशी मागणी आता ठाणेकर नागरिक करत आहेत. काही ठिकाणी कोव्हिशिल्डचे दर हे ७५०, तर कुठे ८५०, तर कुठे ९०० रुपये अशा स्वरुपात ते आकारले जात आहेत. परंतु आता हे दर समान करण्याची मागणी करण्यात येत आहे. असे असले तरी आता खाजगीकरणाच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेला सुरवात झाली असून येत्या काही दिवसात शहरातील इतर केंद्रावर देखील लसीकरण मोहीम सुरु होईल. त्यामुळे महापालिकेच्या केंद्रावर होणारी गर्दीदेखील कमी होण्यास मदत होईल. शिवाय लसीकरण मोहीमेचा वेग वाढून ही मोहीम वेळेत पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.