आधी रॅपिडोवर कारवाई, नंतर त्यांचीच स्पॉन्सरशिप; तीन वर्षे रॅपिडो प्रायोजक, प्रताप सरनाईक यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:04 IST2025-08-09T11:04:16+5:302025-08-09T11:04:50+5:30
...मात्र, रॅपिडो गेली तीन वर्षे प्रो गोविंदाचे प्रायोजक असतानाही मागील महिन्यात कंपनीवर कारवाई केली, असा दावा खुद्द सरनाईक यांनी शुक्रवारी केला.

आधी रॅपिडोवर कारवाई, नंतर त्यांचीच स्पॉन्सरशिप; तीन वर्षे रॅपिडो प्रायोजक, प्रताप सरनाईक यांचा दावा
ठाणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २ जुलै रोजी विधिमंडळ अधिवेशन काळात बेकायदा सुुरू असलेल्या रॅपिडो बाईक टॅक्सीचे बुकिंग करून त्यावर कारवाईचे आदेश दिले. जेमतेम महिना उलटतो ना उलटतो तोच मंत्र्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी वरळी डोम येथे ७ ते ९ ऑगस्टदरम्यान आयोजित केलेल्या प्रो गोविंदाचे प्रमुख प्रायोजकत्व रॅपिडोंनी स्वीकारल्याचे उघड झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र, रॅपिडो गेली तीन वर्षे प्रो गोविंदाचे प्रायोजक असतानाही मागील महिन्यात कंपनीवर कारवाई केली, असा दावा खुद्द सरनाईक यांनी शुक्रवारी केला.
शिंदेगटाचे असलेले सहकार मंत्री संजय गायकवाड, संजय शिरसाट अलीकडेच अडचणीत सापडले असताना आता सरनाईकही वादात सापडले आहेत. राज्य सरकारने बाईक टॅक्सीचे धोरण स्वीकारले आहे. मात्र, अद्याप कुठल्याही कंपनीला अधिकृतपणे परवानगी दिलेली नाही. असे असतानाही रॅपिडो बाईक टॅक्सी ॲपद्वारे सर्रास सुरू आहे. विधिमंडळ अधिवेशन काळात मंत्री सरनाईक यांनी अन्य नाव वापरून रॅपिडो बाईकचे बुकिंग केले. जेव्हा बाईक चालक त्यांना घ्यायला आला तेव्हा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारून कारवाईचे आदेश दिले. सरनाईक यांच्या या कृतीची तेव्हा चर्चा झाली. जेमतेम महिना पूर्ण होत नाही तोच वरळी डोम येथे मंत्र्यांचे पुत्र पूर्वेश यांनी प्रो गोविंदाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक रॅपिडो असल्याचे स्पष्ट झाल्यावर वाद सुरू झाला असून, सरनाईकांवर टीका होत आहे.
‘कारवाईची भीती
दाखवून प्रायोजकत्व’
अगोदर कारवाईची भीती घालून १० कोटी रुपयांत हे प्रायोजकत्व रॅपिडोला घेण्यास भाग पाडल्याचा दावा आ. रोहित पवार यांनी केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर हा खंडणी वसुलीचा प्रकार असल्याची टीका केली व शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांचे हे ‘प्रताप’ थांबवावे, असा दावाही त्यांनी केला.
विरोधकांना प्रत्युत्तर
रोहित पवार हे विरोधी पक्षातील सदस्य आहेत, त्यांनी अनेक वर्षे स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबविलेले आहेत. आरोप केल्याशिवाय त्यांचे दुकान चालणार नाही, असे प्रत्युत्तर सरनाईक यांनी विरोधकांना दिले.