१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता, २ डिसेंबरला लग्न पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 08:50 IST2025-11-24T08:50:03+5:302025-11-24T08:50:52+5:30
आटगावजवळ कार कठड्याला आदळून २ ठार, १ गंभीर जखमी, या अपघातातील मयुरेश चौधरी याचा १५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी त्याचे लग्न होते.

१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता, २ डिसेंबरला लग्न पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला
शहापूर : हळदी समारंभ आटपून घरी परतत असताना भरधाव कार रस्त्याच्या मोरीजवळील कठड्याला आदळली. या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. रविवारी सकाळी ६:३० वाजता मुंबई–नाशिक महामार्गावर आटगावाजवळ ही घटना घडली.
मयुरेश विनोद चौधरी (२९ रा. तानसा), जयेश किसन शेंडे (२५ रा. उंबरखाड) अशी मृतांची नावे आहेत. आटगाव येथील संघवी कॉम्प्लेक्सपुढे मोरीजवळील कठड्याला कार धडकली. अपघातात मयुरेश व जयेश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तर, हर्षल पजाधव (२९ ) गंभीर जखमी झाला.
१० दिवसांवर लग्न पण काळाने घात केला
या अपघातातील मयुरेश चौधरी याचा १५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी त्याचे लग्न होते. मात्र त्याआधीच काळाने घात केला. नातेवाईक आणि मित्र परिवाराला लग्नाचे आमंत्रण देण्याचं काम मयुरेश स्वत: करत होता. १० दिवसांवर लग्न येऊन ठेपल्याने घरी लगबग सुरू होती. २३ नोव्हेंबरला मयुरेश आणि त्याचे २ मित्र लग्नपत्रिका वाटप करून मित्राच्या कारने येत असताना आटगावजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात मयुरेश आणि जयेश जागीच ठार झाले. जयेश हादेखील कुटुबातील एकुलता एक मुलगा होता. ज्यादिवशी मयुरेशने थाटात लग्न होणार होते, दुर्दैवान त्याच दिवशी त्याची दशक्रिया विधी होणार आहे.