इंग्रजी माध्यमातील पाल्य आणि पालक यांचे गोत्र सूत्र जुळत नाही : विश्वास पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 21:43 IST2025-12-05T21:42:33+5:302025-12-05T21:43:49+5:30
या निमित्ताने ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी त्यांची मुलाखत घेतली.

इंग्रजी माध्यमातील पाल्य आणि पालक यांचे गोत्र सूत्र जुळत नाही : विश्वास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मराठी साहित्य,संस्कृती धोक्यात आहे. मराठी शाळेच्या बाबत खूप गांभीर्याने विचार करावा लागेल. इंग्रजी माध्यमात पाल्य टाकली जातात,.ती शिकून मोठी होतात पण खेड्यापाड्यातील शेतकरी किंवा मराठी शाळेत जाणारे विद्यार्थी आणि आई वडील यांचं गोत्र आणि सूत्र जसे जुळते तसे इंग्रजी माध्यमातील पाल्य आणि पालक यांचे गोत्र आणि सूत्र जुळत नाही असे स्पष्ट मत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी शुक्रवारी ठाण्यात व्यक्त केले.
कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा शाखा आणि आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाटील यांचा सत्कार कोमसाप संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेजमध्ये संपन्न झाला. या निमित्ताने ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी त्यांची मुलाखत घेतली. पाटील पुढे म्हणाले की, जर तुम्हाला उत्तम लेखक किंवा कवी व्हायचे असेल, लोकांच्या चिरस्मरणात रहावे असे वाटत असेल तर उत्तम लेखनाला पर्याय नाही . जोपर्यंत उत्तम झालेले आहे हे आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत लिहिणे गरजेचे आहे असे ते म्हणाले . यावेळी पाटील यांनी त्यांच्या विविध कादंबरी लेखनाचा प्रवास उलगडला. अण्णाभाऊ साठे यांनी महानगरी साहित्याचा पाया घातला असल्याचे नमूद केले.
मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो होतो तेव्हा विश्वास साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होईल असे भाकीत केले होते ते आज खरे ठरले आहे असे यावेळी कोमसाप संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्णिक यांनी नमूद केले. साहित्यात राजकारण असू नये . विश्वास पाटील यांनी उत्तम साहित्य लिहिले आहे. त्यांनी अजून पुस्तके लिहून महाराष्ट्राला उपकृत करावे असे आवाहन त्यांनी केले. प्रशासकीय सेवेत असताना पाटील यांनी साहित्यात चौफेर फटकेबाजी केली आहे असे गौरवोद्गार काढत चांगले साहित्य निर्माण होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे को.म.सा.प विश्वस्त आ. संजय केळकर यांनी व्यक्त केले. यावेळी गझलकार दिलीप पांढरपट्टे, को.म.सा.प केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, को.म.सा.प केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रा.प्रदीप ढवळ, को.म.सा.प ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.