रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:38 IST2025-07-09T05:31:41+5:302025-07-09T05:38:05+5:30
मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारत अनेकांना धरपकड करून डांबले, रस्तेही बंद, तरी निघाला मोर्चा; मंत्री सरनाईकांवर भिरकावली पाण्याची बाटली

रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
मीरा रोड : मराठी भाषेचा अवमान आणि मराठी लोकांना अद्दल घडवण्याची व्यापाऱ्यांनी केलेली कथित वक्तव्ये याविरोधात मंगळवारी मीरा रोड येथे संतप्त मराठी भाषकांनी पोलिसांचा विरोध मोडून मोर्चा काढला. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेच्या नेत्यांनी मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी रात्री अनेक नेत्या-कार्यकर्त्यांची धरपकड केली. मोठा पोलिस फौजफाटा तैनात असतानाही त्याला न जुमानता शेकडो मराठी भाषिक रस्त्यावर उतरले. मनसेसह उद्धवसेना, शिंदेसेना, काँग्रेस, मराठी एकीकरण समिती, सकल मराठा समाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांच्यासह अनेक संस्थांचे कार्यकर्ते-प्रतिनिधी मोर्चात सामील झाले होते.
मीरा रोडच्या मिठाई दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी कारवाई सुरू केली असतानाच व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि त्यात मराठी भाषा आणि माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्याविरोधात विविध मराठी भाषक संस्था-संघटना, राजकीय पक्षांनी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
निवडलेल्या मार्गामुळे संघर्षाची शक्यता होती : मुख्यमंत्री
मनसेने मोर्चासाठी निवडलेल्या मार्गामुळे संघर्षाची शक्यता होती. कायदा आणि सुव्यवस्था राखणे पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, त्यामुळे त्यांनी मोर्चाला परवानगी नाकारली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते जाणीवपूर्वक असा मार्ग मागत होते, ज्यातून संघर्ष होईल. त्यावेळी पोलिसांनी नेहमीचा मार्ग मोर्चासाठी घ्या, असे सांगितले. त्यांनी या गोष्टीला नकार दिला. हाच मार्ग घेणार यावर ते ठाम होते, असेही ते म्हणाले.
निशिकांत दुबे यांच्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, खासदार दुबे यांचे वक्तव्य जर तुम्ही पूर्ण ऐकले तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. मराठी माणसांबाबत त्यांनी सरसकट वक्तव्य केलेले नाही. मात्र, तरीही माझे मत असे आहे की अशा प्रकारचे बोलणे योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. मी पुन्हा सांगतो की मराठी माणसांचे योगदान महाराष्ट्रात प्रचंड मोठे आहे.
जमावापुढे पोलिसांचे बळही ठरले दुबळे
एक मोठा जमाव मोर्चाने आल्यानंतर पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. काहींना पकडून बसमध्ये कोंबले, तर काहींना मागे रेटले. मात्र, दुपारी १२:१०च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आणि भगवे झेंडे घेतलेला आणखी एक जमाव आला. त्याने पोलिसांचा बंदोबस्त धुडकावून मोर्चा काढला. पोलिसांनीही जमावाचा संताप पाहून त्यांना अडवण्याचा प्रयत्न सोडून दिला.
कोणाच्या आदेशावरून धरपकड? : नेमका मराठी माणसाचा मोर्चा निघत असताना पोलिसांनी धरपकड का करावी? कोणाच्या आदेशावरून केली, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राला देण्याची गरज आहे, असे उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे म्हणाले.
पोलिसांनी रस्ते केले बंद - पोलिसांनी मनसे, शिंदेसेना, उद्धवसेना आणि मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी रात्री घरात घुसून धरपकड केली. त्यांना रात्रभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. तसेच मोर्चाच्या ठिकाणी लोक येऊ नयेत, म्हणून पोलिसांनी रस्तेही बंद केले होते. मंगळवारी सकाळपासून मोर्चासाठी येणाऱ्यांना पोलिस ताब्यात घेत होते.
अवघ्या १० मिनिटांत मंत्र्यांचा काढता पाय
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक मोर्चात सामील होण्यासाठी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह आले असता मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. सरनाईक यांच्या दिशेने जमावातून पाण्याची बाटलीही भिरकावण्यात आली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत सरनाईक निघून गेले. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही घटना योग्य नव्हती, असे म्हटले. सरनाईक यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. पोलिसांनी व्यापाऱ्यांना मोर्चा काढू दिला, तसा मराठी माणसांनाही काढू द्यायला हवा होता; परंतु पोलिसांनी दबावतंत्र वापरले व वातावरण चिघळले.