भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 06:28 IST2025-11-23T06:27:36+5:302025-11-23T06:28:30+5:30
जेथे मारहाण झाली तेथेच शिंदेसेनेकडून फटाक्यांची आतषबाजी, घरांच्या मुद्रांक शुल्कावरून श्रेयवादाची लढाई

प्रतिकात्मक फोटो
ठाणे : पाचपाखाडी येथील लक्ष्मीनारायण या बीएसयूपी योजनेंतर्गत उभ्या राहिलेल्या इमारतीत गुरुवारी रात्री पेढे वाटण्याकरिता गेलेल्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याने संतापलेल्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री याच इमारतीच्या आवारात जाऊन फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे बीएसयूपी घरांची १०० रुपयांत नोंदणी करण्यासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून शिंदेसेना व भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई तीव्र झाली.
लक्ष्मीनारायण इमारतीत गुरुवारी रात्री सरकारच्या निर्णयाबद्दल पेढे वाटायला गेलेले शिंदेसेनेचे शाखाप्रमुख हरेश महाडिक व उपशाखाप्रमुख महेश लहाने यांना भाजपच्या पवारांनी मारहाण केल्याची तक्रार शिंदेसेनेनीच पोलिसात दाखल केली. या प्रकरणावरून दोन्ही पक्षांत शुक्रवारी दिवसभर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यानंतर शुक्रवारी रात्री शिंदेसेनेकडून त्याच ठिकाणी जल्लोष साजरा करीत भाजपला अप्रत्यक्ष उत्तर दिले. ठाण्यात गेल्या काही महिन्यांपासून शिंदेसेना आणि भाजपचे नेते आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. राज्य मंत्रिमंडळाने बीएसयूपी योजनेप्रकरणी घेतलेला निर्णय व्हावा याकरिता आपणच पाठपुरावा केला असा दावा भाजप व शिंदेसेनेच्या नेत्यांनी केला होता.
गुरुवारी रात्री शिंदेसेनेचे पदाधिकारी लक्ष्मीनारायण इमारतीतीमधील रहिवाशांना भाजपच्या प्रयत्नातून घरे मिळाली असल्याने तुम्ही येथे पेढे का वाटता असा सवाल पवार यांनी केला. त्यामुळे पवार व शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बाचाबाची झाली. पवार यांनी महाडिक यांच्या कानाखाली मारली, तर लहाने यांनाही धक्काबुक्की करीत मारहाण केली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पवार यांच्या विरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.
अपमानाचा वचपा काढण्यासाठी केला जल्लोष...
ठाण्यात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपकडून झालेली मारहाण शिंदेसेनेच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. या अपमानाचा वचपा काढण्याकरिता शुक्रवारी रात्री शिंदेसेनेने याच ठिकाणी मोठा जल्लोष करीत भाजपला उत्तर दिल्याचे शिंदेसेनेचे म्हणणे आहे.उपविभागप्रमुख व शाखाप्रमुख यांना जेथे मारहाण झाली त्याच ठिकाणी राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सैनिक मोठ्या संख्येने जमले. फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवून त्यांनी आनंद व्यक्त केला.