Surendra Patil Dombivli: डोंबिवलीचा 'रील स्टार' पुन्हा अडकला! सुरेंद्र पाटीलला पोलिसांनी केली अटक, नवा कारनामा काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:09 IST2026-03-31T13:05:27+5:302026-03-31T13:09:35+5:30
Surendra Patil Dombivli Arrested: डोंबिवलीतील सुरेंद्र पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. २०२३ मध्ये त्याला १ वर्षांसाठी ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.

Surendra Patil Dombivli: डोंबिवलीचा 'रील स्टार' पुन्हा अडकला! सुरेंद्र पाटीलला पोलिसांनी केली अटक, नवा कारनामा काय?
Surendra Patil Dombivli Crime News: डोंबिवलीतील ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणारा सुरेंद्र चौधरी उर्फ पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे ७ रिव्हॉल्व्हर, ३७१ जिवंत काडतुसे आणि १६७ एनर गनच्या गोळ्यांचा साठा सापडला आहे. गँगस्टर असल्यासारखे व्हिडीओ तो पोस्ट करतो. त्याच्यावर यापूर्वी बलात्कारासह इतर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.
एका गुन्ह्यात सुरेंद्र पाटील तुरुंगात होता. जामिनावर सुटका झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखा आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्तपणे त्याच्यावर पुन्हा कारवाई केली आहे. त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात विना परवाना शस्त्रे आढळून आली. ७ रिव्हॉल्व्हर, ३७१ जिवंत काडतुसे, तलवार आणि चॉपर आदी गोष्टी त्याच्या बंगल्यात छापा टाकल्यानंतर मिळाल्या असून, पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.
अवैध शस्त्रे लपवण्यासाठी शू रॅकजवळ गुप्त जागा
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाटील याच्या दावडी येथील बंगल्यावर गुन्हे शाखेने शनिवारी (२८ मार्च) मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी बंगल्याची झाडाझडती घेतली. चप्पल बूट ठेवायचा स्टॅण्ड बनवण्यात आलेला आहे. तिथेच एक गोपनीय कप्पा होता, जो सहज दिसत नव्हता. पोलिसांना त्यात रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे, एअर गनच्या गोळ्या मिळाल्या.
सुरेंद्र पाटीलच्या घरात तलवार, चाकू, कोयते आणि इतर धारदार शस्त्रेही पोलिसांना मिळाली. या शस्त्रांची किंमत १० लाख रुपये असल्याचे कळते. पोलिसांनी जप्त केलेल्या रिव्हॉल्व्हरपैकी पाच देशी आहेत. तर काहींवर मेड इन यूएसए आणि स्पेशल ऑटो असे लिहिलेले आहे.
पोलिसांनी एका वर्षासाठी केले होते तडीपार
बांधकाम व्यावसायिक असलेल्या सुरेंद्रला रील्स बनविण्याचा नाद आहे. फक्त पोलिसांच्या खूर्चीत बसूनच नव्हे तर त्याआधी त्याने चकक हातात बंदूक घेऊन, भरपूर रोकड समोर ठेवूनही रील्स बनवले आहेत.
ऑक्टोबर २०२३ मध्ये मानपाडा पोलीस ठाण्यात त्याने बनविलेले रील्स त्याला चांगलेच महागात पडले होते. मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील तक्रारदार म्हणून गेलेल्या सुरेंद्रने कक्षात कोणी नसताना पोलीस अधिकाऱ्याच्या खूर्चीवर बसून रील्स बनवला होता. यात त्याला अटक देखील झाली होती.
सुरेंद्र विरोधात विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यात बलात्काराच्या प्रकरणाचाही समावेश आहे. त्याची २०२३ मध्ये ठाणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपारी करण्यात आली होती.