स्कूलबसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवा, डोंबिवली उड्डाणपुलाबाबत पालकांना धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:37 AM2019-06-26T00:37:15+5:302019-06-26T00:37:38+5:30

पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक असल्याचे रेल्वेने घोषित केला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला नाही.

Dombivli flyover threatens in parents | स्कूलबसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवा, डोंबिवली उड्डाणपुलाबाबत पालकांना धास्ती

स्कूलबसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवा, डोंबिवली उड्डाणपुलाबाबत पालकांना धास्ती

Next

- जान्हवी मोर्ये
डोंबिवली  - पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक असल्याचे रेल्वेने घोषित केला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला नाही. मात्र या पुलावर वाहतूककोंडी होऊ न त्यात स्कूलबसची रखडपट्टी होत आहे. त्यामुळे पालकांना भीती वाटत असून या बसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ओमकार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी या पुलावरून स्कूलबसची वाहतूक करू नये. तसेच, अवजड वाहनांना बंदी घालून धोकादायक पूल असल्याचे फलक लावावेत, यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला आहे. चव्हाण यांनी या पुलाची फाइल फेरतपासणीसाठी गेली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही, असे त्यांना सांगितले.

स्कूलबसमध्ये किमान ५५ विद्यार्थी असतात. तसेच पुलाखालून रेल्वे लाइन गेली असून केवळ विद्यार्थ्यांचा नव्हे, तर नागरिकांचाही जीव धोक्यात आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल पालकांनी केला आहे. तसेच यंत्रणांनी पूल धोकादायक असल्याचा फलक लावल्यास शाळेला वाहतूक वळवण्याची सूचना करता येईल. अन्यथा ही मागणी कोणत्या आधारावर केली आहे, असे शाळेकडून विचारणा होऊ शकते.
शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या पालक अपर्णा सावंत यांनी सांगितले की, हा पूल बंद करण्यात येणार होता. मात्र, प्रत्यक्षात हा पूल सुरू आहे.

धोकादायक असल्यामुळे या पुलावरून अवजड वाहने नेण्यात येऊ नयेत. आमचा शाळेत गेलेला मुलगा घरी सुखरूप येईपर्यंत धाकधूक लागलेली असते. आम्ही आमच्या शाळेला वाहतूक वळविण्याची मागणी करू, पण इतर मुलांचे काय? कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज असल्याने आम्ही ही मागणी केली आहे. प्रशासनाने पुलाची डागडुजी तरी करावी. कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट आम्हाला पाहायची नाही.

फुले रोड परिसरात राहणाºया पालक तृप्ती जगताप म्हणाल्या की, या पुलावरून लहान वाहनांची वाहतूक सुरू ठेवावी. मात्र, अवजड वाहने आणि शालेय बस यांची वाहतूक ठाकुर्ली पुलावर वळविण्यात यावी. पश्चिम परिसरात अनेक बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. एवढी या पुलाची क्षमता उरली आहे का, हेही पाहावे. वर्षा थळकर म्हणाल्या की, आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही. फुले रोडवरून जाणाºया बसला ठाकुर्ली पूल सोयीस्कर ठरतो. मात्र, स्टेशन परिसरातील मुलांना घेऊन बस या पुलावरून जाण्याची तसदी घेणार नाहीत. त्यामुळेच सर्वच बसची वाहतूक वळवावी.

उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी संजय ससाणे म्हणाले की, कोपर पुलासंदर्भातील निर्णय हे रेल्वे प्रशासन, आरटीओ आणि केडीएमसी या यंत्रणा एकत्रित घेतात. १२ टनांपेक्षा कमी वजन असलेल्या वाहनांना या पुलावर बंदी नाही. शालेय वाहने ही १२ टनांपेक्षा कमी आहेत की नाही हे सांगता येणार नाही. काही जुन्या बसचे वजन हे १२ टनांपेक्षा जास्त आहे. यासंदर्भात माहिती मागितली किंवा अभिप्राय मागतल्यास ती आम्ही देऊ.

पालकांनी केला सुरक्षा उपाय
ओमकार इंटरनॅशनल स्कूलमधील पश्चिम विभागात राहणाºया पालकांनी एक व्हॉट्सअ‍ॅप गु्रप बनवला आहे. त्यांनी पुलावरून शालेय वाहतूक करण्यास
मनाई केली आहे. या पालकांनी आपल्या वैयक्तिक वाहनांचा वापर करून किंवा रिक्षाने मुलांना स्टेशनपर्यंत घेऊन येण्याचा आणि तिथून पुढे जीना उतरून पाल्याला बसमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून पश्चिमेतील विद्यार्थ्यांनी पूर्वेत बस पकडण्यास
सुरुवात केली आहे.

Web Title: Dombivli flyover threatens in parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.