बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या संचालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 00:35 IST2021-04-04T00:29:57+5:302021-04-04T00:35:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रेल्वे स्थानक परिसरातील पॅराडाइज टॉवरमध्ये स्वयंरोजगार केंद्र चालविणाऱ्या कंपनीच्या नावाने शेकडो तरुणांकडून पैसे उकळणाऱ्या ...

नोकरी देण्याच्या प्रलोभनाने गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रेल्वे स्थानक परिसरातील पॅराडाइज टॉवरमध्ये स्वयंरोजगार केंद्र चालविणाऱ्या कंपनीच्या नावाने शेकडो तरुणांकडून पैसे उकळणाऱ्या तिघांपैकी मनीषकुमार यादव या संचालकाला नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी या प्रकाराचा भंडाफोड करीत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पॅराडाइज टॉवरमध्ये अल्फा एंटरप्रायझेस कंपनी प्लेसमेंटच्या नावावर पैसे उकळत असल्याची तक्रार काही तरुणांनी रेपाळे यांच्याकडे केली होती. त्याची दाखल घेत शिवसेना ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार आणि परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्यासह कंपनीच्या कार्यालयात शुक्रवारी धडक दिली. यावेळी त्यांनी तेथील कंपनीच्या संचालकांकडे त्यांनी याबाबत जाब विचारला. तेव्हा नोकरीची गरज असलेल्यांकडून २०० रुपये नोंदणी शुल्क आणि नोकरी लावण्यासाठी दोन हजार रुपये घेतले जात होते. त्याबदल्यात २५ हजार रुपये पगाराची नोकरी आणि नोकरी दिल्यावर पैसेही परत देण्याचे आश्वासन या कंपनीकडून दिले जात होते. पैसे भरल्यानंतर नोकरी मिळाली नाही तर त्यांना कंपनीचे कथित संचालक तिथेच काम करायला भाग पाडत होते. त्याबदल्यात त्यांना पगारही दिला जात नव्हता.
संतोषच्या पत्नीला नोटीस बजावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले. मनीषकुमार याला रेपाळे यांनी नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. जोपर्यंत या मुलांना पैसे परत मिळत नाही, तोपर्यंत या विषयाचा पाठपुरावा शिवसेनेतर्फे करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील अनधिकृतपणे चालणाऱ्या प्लेसमेंटची तक्रार पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे करणार असल्याची माहिती रेपाळे यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत १७ तक्रारदारांची ३७ हजार २४३ इतकी फसवणूक झाली असून सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.
तीन महिने पगार नाही
संचालक संतोष पांडे हे त्यांच्या पत्नी ज्योती यांना पुढे करून गरजू तरुणांना फसविण्याचे काम करीत होते. आतापर्यंत सुमारे दीड हजार तरुणांकडून या कंपनीने दोन हजार २०० रुपये प्रमाणे पैसे गोळा केल्याचा आरोप आहे. तसेच नोकरीस ठेवलेल्या मुलांनाही तीन महिने पगार दिलेला नाही.
सहा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
मुख्य सूत्रधार संतोष पांडे हा फरार झाला असून, त्याचा साथीदार मनीषकुमार याला अटक करण्यात आली आहे. त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.