“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 08:44 IST2025-11-01T08:43:05+5:302025-11-01T08:44:48+5:30
Deputy CM Eknath Shinde News: मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. लहानपणी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत पंढरपूरला जात होतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde News:ठाणे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवनघाट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५१ फूट उंचीच्या भव्य विठ्ठल मूर्तीचे अनावरण संपन्न झाले. या वेळी भक्तांची मांदियाळी उसळली होती. मंत्री प्रताप सरनाईक, अन्य मान्यवर व जनतेच्या साक्षीने हा ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळा पार पडला. यानिमित्ताने कार्तिकी एकादशीच्या महापूजेला जाण्यापूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
ठाणे बदलत आहे. हा घाट अहिल्यादेवींच्या नावाने उभारला आहे. मीरा-भाईंदर येथे २ आणि कासार वडवली येथे १ अशा चार ठिकाणी अशा विठ्ठल मूर्ती उभारल्या जातील. आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आपण भगवान पांडुरंगाची सेवा करतो, पण आज तुमच्या सर्वांच्या रूपाने पांडुरंग येथे उपस्थित आहे. पांडुरंगाची 51 फूट उंच अशा भव्य मूर्तीची स्थापना ठाण्यात झाली आहे. हे कार्य प्रताप सरनाईक आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाले. ठाणेकर भाग्यवान आहेत. मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. लहानपणी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत पंढरपूरला जात होतो. आज उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर विठ्ठल भक्त म्हणून येथे आलो आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे
तुमच्या आशीर्वादाने शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास शक्य झाला. वारकरी संप्रदाय जिथे बोलावतो तिथे धावून येतो. वारकरी दिंड्यांना अनुदान, विमा आणि वाहन टोलमुक्ती हे महायुती सरकारनेच केले. पंढरपूरमध्ये स्वच्छता, पाणी, मोबाईल सुविधा, शौचालये उपलब्ध केली आहेत. मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. शंकराचार्यांनी मला 'काऊ मॅन' ही पदवी दिली आणि ते माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सरकार मदत करेलच. पण ज्यांच्या घरी लग्न ठरले आहे ते लग्न मोडणार नाही; सर्व खर्च शिवसेना करेल. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. इंदुरीकर महाराज साध्या, सोप्या भाषेत समाजाला दिशा देतात. हरिनाम सप्ताहात सहभागी झाल्याने वाईट विचार जातात, अशी शिकवण आम्हाला आनंद दिघे यांनी दिली, असे शिंदे यांनी म्हटले आहे.