मृत नगरसेवकाच्या फेसबुक खात्यावरून सत्ताधारी लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:38 IST2025-09-02T12:36:47+5:302025-09-02T12:38:43+5:30
उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याची चौकशीनंतर सुटका; मारहाण केल्याचा दावा

मृत नगरसेवकाच्या फेसबुक खात्यावरून सत्ताधारी लक्ष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: भाजपचे दिवंगत नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने फेसबुक अकाउंटवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला. अन्य एका प्रकरणात बनावट अकाउंट तयार करून त्यावरूनही बदनामीकारक मजकूर पोस्ट केला जात आहे. याप्रकरणी संशयित म्हणून आपल्याच कार्यकर्त्याला नाहक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी सोमवारी केला. त्याला ताब्यात घेतल्यानंतरही फेक आयडीवरून ‘टायगर अभी जिंदा हैं,’ अशी पोस्ट रविवारी केल्याकडे सरैय्या यांनी लक्ष वेधले. यातील संशयिताला चौकशीनंतर सोडले असून, कोणालाही मारहाण केली नसल्याचा दावा श्रीनगर पोलिसांनी केला.
विलास कांबळे यांच्या नावाशी मिळतेजुळते असलेले एक अकाउंट अनोळखी व्यक्तीने तयार केले. तसेच सुशील सिंग यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावरून बदनामीकारक संदेश प्रसारित केले. कांबळे यांच्या नावाचे बनावट आयडी तयार करून त्यावरून शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांवर टीकाटिप्पणी करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. याबाबत सुशील कुमार सिंग (३६, डिलिव्हरी बॉय, विटावा, ठाणे) यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला.
चंद्रेशला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर काही काळानंतर सोडून दिले. त्याला मारहाण केलेली नाही. विलास कांबळे यांचे फेसबुक अकाउंट बंद केले आहे. सुशील सिंग यांचे अकाउंट हॅक केल्याचा हा वेगळा प्रकार आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी दिली.
धक्काबुकीचा आरोप
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत श्रीनगर पोलिसांनी उद्धवसेनेच्या कथित कार्यकर्ता असलेल्या चंद्रेश यादव याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला सोडून दिले. दिवंगत नगरसेवक विलास कांबळे यांचे बंधू सुरेश कांबळे हे श्रीनगर पोलिस ठाण्यात गेले असता, पोलिस ठाण्याच्या आवारातच त्यांनाही शिंदेगटाच्या काही शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप सरैय्या आणि कांबळे यांनी केला.