"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:46 IST2025-10-20T17:03:11+5:302025-10-20T17:46:58+5:30
निवडणूक झाली तर महायुतीचा ॲटम बॉम्ब थेट त्यांच्या खुर्चीखाली फुटणार असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढला.

"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
ठाणे - विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही. कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्व उडून जाईल” असा स्फोटक इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला. महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, म्हणूनच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमचीच सत्ता येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाण्यातील रहेजा गार्डन येथे पार पडलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधक दररोज आरोपांचे फटाके फोडतात, पण त्यांच्या त्या फुसक्या लवंग्यांचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. आम्ही कामगिरीच्या ॲटम बॉम्बने महाराष्ट्र उजळवणार आणि विरोधकांचा धुरळा उडवणार आहोत. आमचं लक्ष विकासावर आहे आणि विरोधकांचं काम फक्त आरोप, टीका करणे आहे असा टोला शिंदेंनी लगावला.
तसेच ठाण्यातील तरुणाईत आज जेवढा उत्साह आणि जल्लोष दिसतोय, ते महाराष्ट्राचं भविष्य आहे. ही परंपरा स्व. आनंद दिघे यांनी रुजवली, आणि आम्ही ती पुढे नेत आहोत. गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी ठाण्याचा प्रत्येक सण शक्तीचं प्रदर्शन असते. ठाणेकर हे माझं कुटुंब आहे. त्यांच्याच आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. आज मला आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. बाळासाहेबांनी ठाण्यावर प्रेम केलं, दिघे साहेबांनी विकास केलाय. म्हणूनच ठाण्याला सणांची पंढरी म्हणतात असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
दरम्यान, शेतकरी संकटात असताना शिवसेना आणि महायुती सरकार त्यांच्यासोबत उभं आहे. आम्ही दिलेलं वचन पाळलं. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीचा पैसा पोहोचतोय. या पुरात धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या गायी वाहून गेल्या, त्या शेतकऱ्यांना १०१ दुभत्या गायी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. कारण शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणं ही आमची संस्कृती आहे. संकटात धावून जाणं आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी शिकवलं आहे. त्यामुळे आम्ही केवळ बोलत नाही, कृती करून दाखवतो असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
◻️LIVE📍ठाणे 🗓️ 20-10-2025
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 20, 2025
📹 'आली माझ्या घरी ही दिवाळी' कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/I2V0ZsjPGC
विरोधकांना पराभव दिसतोय, म्हणून...
विधानसभेच्या निवडणुकीसारखं येत्या निवडणुकीत आम्ही पुन्हा बहुमताने विजयी होणार आहोत. राज्यातील शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आम्ही काम करतो आणि जनता त्याचं उत्तर मतपेटीत देते. विरोधकांना आता पराभव दिसू लागलाय. म्हणून ते निवडणूक आयोग, ईव्हीएम, महायुती आणि आम्हाला दोष देतात. निवडणुका होऊ शकल्या नाहीत कारण याचिका सुप्रीम कोर्टात होती. त्याला आम्ही जबाबदार नाही. आता हेच विरोधक ‘निवडणुका घेऊ नका’ अशी विनंती करत आहेत. कारण त्यांना माहिती आहे. निवडणूक झाली तर महायुतीचा ॲटम बॉम्ब थेट त्यांच्या खुर्चीखाली फुटणार असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढला.