दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 13:22 IST2025-08-16T13:19:00+5:302025-08-16T13:22:56+5:30
Dahi Handi 2025 World Record: संस्कृतीच्या दहीहंडीत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने रचला विश्वविक्रम, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाखांचे पारितोषिक केले जाहीर

दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
Dahi Handi 2025 World Record: श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर आता मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये दहीहंडीचा थरार पाहायला मिळत आहे. दहीहंडी पथके विविध भागांत जाऊन मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे मुंबई आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत असला, तरी गोविंदा पथकांचा उत्साह कमी झालेला नाही. दादरच्या आयडियल येथील दहीहंडी महिला गोविंदांनी फोडली. यातच ठाण्यात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडी कार्यक्रमात १० थर रचण्याचा हा विश्वविक्रम करण्यात आला. जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथकाने ही विश्वविक्रमी कामगिरी करून दाखवली. यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. मी पारितोषिक आधीच जाहीर केले होते. कोकण नगर मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती दाखवली. कोणी कितीही काही म्हणू द्या, तुम्ही मराठी एकी दाखवली. मी या पथकाला २५ लाखांचे बक्षीस जाहीर करतो, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. काही गोविंदा पथकानं वाटते आमचा विश्वविक्रम मोडणार नाही पण दुसरे पथक देखील विश्वविक्रम मोडत असतो. विश्व विक्रम मोडण्यासाठी असतो. याच मैदानावर आधी पण विश्व विक्रम झाला आहे आणि आताही झाले, असेही ते म्हणाले.
१० थर रचल्यावर पूर्वेश सरनाईक भावूक
जोगेश्वरीचा गोविंदा पथक असून, तेथील विशाल कोचरेकर गोविंद म्हणाले की, आम्हाला आत्मविश्वास होता की, यंदा आम्ही १० थर लावणार. गेल्या २०२२ मध्ये इथेच आम्ही नऊ थरांचा विश्वविक्रम केला होता. यावेळेस आमच्या पथकात ५५० गोविंदा होते. दोन महिने सराव केला होता. पहिल्या दिवसापासून दहा थरांचा सराव करत होतो. विवेक कोचरेकर हे आमचे प्रशिक्षक म्हणाले की, जखमी न होता तुम्ही हे थर लावा. यादरम्यान १० थर रचल्यावर पूर्वेश सरनाईक भावूक झाल्याचे सांगितले जात आहे. येथे आलेल्या स्पॅनिश पाहुण्यांनीही यावेळी आनंद व्यक्त केला.
दरम्यान, कोकण नगर नंतर आर्यन गोविंदा पथकाने संस्कृतीच्या दहीहंडीत नऊ थरांची सलामी दिली. यंदा ऑपरेशन सिंदूर जनजागृती केली जात आहे. शोले चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मानवंदना देण्यात आली आहे, त्यामुळे शोलेची प्रतिकृती येथे पाहायला मिळत आहे.
ठाणे: २०२५ मधील पहिला १० थरांचा विश्वविक्रम, जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने प्रताप सरनाईकांच्या संस्कृती दहीहंडी कार्यक्रमात रचले १० थर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आनंद. #dahihandifestival#thanepic.twitter.com/JKEVf0fddR
— Lokmat (@lokmat) August 16, 2025