ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये वारंवार होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमुळे ज्या उद्देशाने हे मैदान विकसित करण्यात आले होते, त्या हेतूलाच हरताळ फासला जात आहे. यापुढे टेनिस बॉल स्पर्धा सुरू राहिल्या तर बीसीसीआय, एमसीएने दिलेली मान्यता रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास या मैदानात भविष्यात १७ वर्षांखालील, आयपीएल किंवा विजय हजारे सारख्या क्रिकेट स्पर्धाच होऊ शकणार नाहीत. त्यामुळे हे स्टेडिअम यापुढे केवळ सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेसाठीच उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आला.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात ठाणे महापालिकेचे दादोजी कोंडदेव क्रीडा मैदान आहे. याठिकाणी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने व्हावेत या उद्देशाने मैदानातील मुख्य खेळपट्टी व आऊट फिल्डच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर या मैदानाची नोंद बीसीसीआय, एमसीएमार्फत घेण्यात आली. येथे फक्त सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा व सरावाचे आयोजन करण्याची अट यापूर्वी विभागामार्फत घातली होती.
२०२३ मध्ये प्रस्तावास मान्यताटेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांसाठी महापालिकेच्या माध्यमातून मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकूल, बोरीवडे येथील मैदान उपलब्ध करून देण्यात आले. परंतु असे असतानाही दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या. टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठीच्या प्रस्तावाला २०२३ मध्ये मान्यता दिली होती.
टेनिस क्रिकेटच्या सर्वाधिक स्पर्धाटेनिस बॉल स्पर्धांना मान्यता दिल्यानंतर स्टेडियममध्ये त्याच स्पर्धांचे आयोजन अधिक होत होते. त्यामुळे बीसीसीआय, एमसीएमार्फत आयोजित विविध रणजी सामन्यांना प्राधान्य देता येत नव्हते. यावर्षी याचा फटका बीसीसीआयच्या महिला क्रिकेट स्पर्धा तसेच १७ वर्षांखालील वयोगटातील विजय हजारे या स्पर्धांना बसला.
मैदानाची झीज झाल्याने नुकसानस्टेडियममधील खेळपट्टी सिझन बॉल क्रिकेटकरिता तयार केले आहे. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत असल्याने मैदानाची झीज होऊन नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे बीसीसीआय, एमसीएने दिलेली मान्यता रद्द होऊ शकते, अशी भीती महापालिकेला वाटू लागल्याने अखेर त्यांनी टेनिस क्रिकेट स्पर्धा खेळविण्याचा निर्णय मागे घेतला.