Curse of the river Valdhuni to Ulhasnagar? | उल्हासनगरला वालधुनी नदीचा शाप?

उल्हासनगरला वालधुनी नदीचा शाप?

- सदानंद नाईक, उल्हासनगर

हाजीमलंग पहाडातून उगम पावणारी वालधुनी नदी ग्रामीण भागातून वाहत येऊन अंबरनाथ, उल्हासनगर व कल्याणमार्गे उल्हास नदी खाडीला मिळते. २० ते २५ वर्षांपूर्वी नदीच्या पाण्याचा वापर ग्रामीण नागरिक पिण्यासाठी करत होते. तसेच नदीकिनारी खुली जमीन होती. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी पुणे शहराच्या धर्तीवर नदीच्या दोन्ही बाजूंनी उद्यान सुरू करण्याची संकल्पना महासभेत मांडली होती. तसेच नदीकिनाऱ्याची पाहणी केली होती. मात्र, त्याला विरोध झाल्यावर नदीकिनाºयावरील खुली जमीन कोणाच्या घशात गेली, हा संशोधनाचा विषय झाला. नदीकिनारी शेकडो बांधकामे उभी राहिल्याने नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन नदीकिनाºयाच्या घरांना पुराचा फटका बसत आहे.
दरम्यान, अंबरनाथ व उल्हासनगरातील सांडपाणी विनाप्रक्रिया थेट नदीपात्रात सोडले जात आहे. तसेच अंबरनाथ केमिकल झोनमधील कारखान्यांचे सांडपाणी नदीत सोडले जाते. नदीचे हे पाणी दरपाच मिनिटांनी रंग बदलत असल्याचा आरोप होत आहे. उल्हासनगरातील शेकडो जीन्स कारखाने सांडपाणी सोडत असल्याचा प्रकार न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशान्वये शेकडो जीन्स कारखाने सील करण्यात आले. वालधुनी नदीचा नाला बनल्याने नदी वाचवण्यासाठी वालधुनी बिरादरी नावाची संस्था समाजसेवी नागरिकांनी स्थापन केली. संस्थेमार्फत जनजागृती करून नदीला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
वालधुनी नदीच्या किनाºयावरील खुल्या जागेवर अतिक्रमण होऊ न शेकडो झोपड्या व पक्की बांधकामे उभी राहिली. तसेच पूरनियंत्रणरेषेच्या आत बांधकामे होऊन नदीच्या किनारी उल्हासनगर व अंबरनाथ शहरांच्या भुयारी गटारांची पाइपलाइन टाकण्यात आली. यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊ न उथळ झाले आहे. २६ जुलैच्या महापुरासारखा फटका यावर्षीही २६ जुलैला बसला आहे. हजारो नागरिकांची घरे नदीच्या पुराखाली होती. अंगावरील कपडे सोडून घरातील कपडे, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मुलांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले असून शासनाच्या मदतीकडे त्यांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पक्षीय नेते, समाजसेवी संघटना आपल्या क्षमतेनुसार अन्नधान्य, कपडे, अंथरूण व आर्थिक मदत देत आहे. मात्र, ती अपुरी असल्याचा टाहो पूरग्रस्त नागरिकांनी फोडल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
२६ जुलैला पुराचे पाणी परिसरातील हजारो घरांत घुसल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. दरवर्षी कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती हजारो नागरिकांच्या वाट्याला येत असून यातून ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे. तहसील कार्यालयाने १८०० पेक्षा जास्त पूरग्रस्त घरांचे पंचनामे केले आहेत.

संरक्षक भिंत हवी
वालधुनीचे पात्र रुंद करण्यासाठी पूरनियंत्रणरेषेतील बांधकामे जमीनदोस्त करावी लागणार आहेत. त्यानंतर, दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधल्यास पुराचा धोका कमी होणार आहे. सखल भागांसह किनाºयावरील घरांचे पुनर्वसन करण्याची योजना राबवणे गरजेचे झाले.

शहराच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी वरदान की शाप, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. दरवर्षी नदीच्या पुराचे पाणी हजारो नागरिकांच्या घरांत जाऊ न त्यांचे संसार उघड्यावर पडत असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात नदीचे पात्र रुंद व खोल करणे, नदीकिनारी संरक्षक भिंत बांधणे आदी उपाययोजना केल्यास नदी शाप ठरण्याऐवजी वरदान ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी वालधुनी बिरादरी नदीबाबत जनजागृती करीत असूनही महापालिका व राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे.

सांडपाणी बंद करा
वालधुनी नदीला वडोलगाव येथे अंबरनाथ परिसरातून आलेला नाला मिळतो. याच नाल्यात अंबरनाथ येथील केमिकल झोनमधील कारखाने सांडपाणी सोडत असल्याने नदीच्या पात्रातील पाणी पाच मिनिटांनी रंग बदलत आहे. प्रदूषणाचा ठपका ठेवून उल्हासनगरातील शेकडो जीन्स कारखाने न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले. त्याचप्रमाणे केमिकल झोनमधील कारखान्यांवर बंदी कधी आणणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Curse of the river Valdhuni to Ulhasnagar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.