Coronavirus patient gets new 'vision' due to minister Eknath Shinde's promptness | एकनाथ शिंदेंच्या तत्परतेमुळे कोरोनाबाधित रुग्णाला मिळाली नवी 'दृष्टी'

एकनाथ शिंदेंच्या तत्परतेमुळे कोरोनाबाधित रुग्णाला मिळाली नवी 'दृष्टी'

ठाणे: राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अचानक पीपीई किट घालून कोरोना रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोनाबाधित रूग्णांची विचारपूस करून त्यांचे आणि तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांसह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचेही मनोधैर्य उंचावले. यावेळी त्यांनी काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्या. दरम्यान, कोरोना रूग्णालयातील सर्व रूग्णांना त्यांच्या वतीने दूध, अंडी आणि फळे देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कल्याणची बैठक आटोपून शिंदे ठाण्याला परतत होते. त्यावेळी त्यांनी अचानक गाडी कोवीड रूग्णालयाकडे घेण्यास फर्मावले. त्याठिकाणी पोहचल्यानंतर त्याठिकाणच्या सुविधांचीही त्यांनी पाहणी केली. त्याचवेळी पीपीई किट परिधान करुन डॉक्टरांसोबत कोरोना बाधित रूग्णांच्या वॉर्डमध्ये भेटी दिल्या.

शिंदे यांनी डायलेसीस, आयसीयू, ऑक्सीजन आणि नॉन ऑक्सीजन वार्डलाही भेटी दिल्या. केवळ भेटच नाहीतर त्यांनी यावेळी रुग्णांची विचारपूसही केली. जेवण व्यवस्थित मिळते का? औषधे दिली जातात का? काही अडचणी आहेत का? अशी विचारपूस त्यांनी केली. त्याचबरोबर डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांच्याशीही त्यांनी संवाद साधून रुग्णांबरोबरच स्वत:ची काळजी घेण्याच्याही त्यांनी सूचना केल्या.

या भेटीत त्यांनी रूग्णांना गरम पाणी मिळते का, तसेच शौचालये आणि स्वच्छतागृहांची स्वच्छता चांगली ठेवली जाते का? याचीही पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर, संदीप माळवी आणि इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

मंत्र्यांनी मागविला रुग्णाच्या घरुन चष्मा-

आपल्याकडे चष्मा नसून तो घरुन मागवायचा असल्याची विनवणी या भेटीदरम्यान एका रुग्णाने पालकमंत्री शिंदे यांच्याकडे केली. हे गा-हाणे ऐकताच शिंदे यांनीही तातडीने तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या रुग्णाच्या घरी फोन करुन त्यांचा चष्मा मागविल्याने या रुग्णालाही हायसे वाटले.

Web Title: Coronavirus patient gets new 'vision' due to minister Eknath Shinde's promptness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.