CoronaVirus Lockdown News: आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच करावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 11:55 PM2021-04-08T23:55:20+5:302021-04-08T23:55:34+5:30

निकष पाळले तरी निर्बंध का? कारागिरांच्या खात्यात महिना २० हजार रुपये द्या : नाभिकांची मागणी

CoronaVirus Lockdown News: Beard-cutting has to be done at home for a month now | CoronaVirus Lockdown News: आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच करावे लागणार

CoronaVirus Lockdown News: आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच करावे लागणार

googlenewsNext

- जितेंद्र कालेकर

ठाणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक झळ ही नाभिक समाजाला सोसावी लागली. सर्वात शेवटी अनेक निर्बंध ठेवून हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली. तरी पुन्हा आता सरसकट दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. दुकान बंदच ठेवायचे तर घर कसे चालवायचे? महिना किमान २० हजार रुपये या कारागिरांच्या बँक खात्यात टाकले जावेत, मग खुशाल बंदचे आदेश द्या, असा सूर आता नाभिक व्यावसायिकांमधून उमटत आहे.

ऑक्टोबर अखेरीस ही दुकाने सुरू झाली. जेमतेम गाडी रुळावर येत असताना ती पुन्हा बंद केली आहेत. मग रोजच्या रोजीरोटीसाठी काय करायचे? संसाराचा गाडा कसा हाकायचा? असा सवाल आता ठाण्यातील या व्यावसायिकांनी केला आहे. ठाणे शहरातील ८० टक्के सलून व्यावसायिक हे भाडे तत्त्वावरील दुकानांमध्ये व्यवसाय करीत आहेत. अशा वेळी लॉकडाऊनमुळे दुकानाच्या भाड्याबरोबरच कारागिरांचा पगार, घरभाडे, मालमत्ता, पाणीकर आणि इतर खर्च कसा चालवायचा असा यक्ष प्रश्न त्यांनी केला आहे.

राज्य शासनाच्या शॉप ॲक्टच्या लायसन्सच्या आधारे सर्व सलून पार्लर  मालक आणि कारागिर यांच्या बँक खात्यात गुजरात, कर्नाटक सरकारच्या धर्तीवर दरमहा अनुदान रक्कम द्यावी. तसेच शाळा फी, घरभाडे, दुकानभाडे आणि लाईट बिल यात सूट द्यावी. इतर व्यावसायिकांप्रमाणे सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सलूनसाठी परवानगी दिली जावी. सर्व सलून तसेच पार्लर व्यावसायिकांना प्राधान्याने कोविडवरील लस उपलब्ध करावी.  लॉकडाऊनमधून या व्यावसायिकांना वगळावे, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री संत सेना पुरोगामी नाभिक संघ, ठाणे यांनी दिले आहे. 

भाडे निघणेही होत आहे अवघड
आधी पीपीई किट, युज अ‍ॅण्ड थ्रो चादर, हॅण्ड ग्लोव्हज आणि सॅनिटायझर अशा सर्वच निर्बंधांसह दुकाने सुरू केली होती. २२ मार्च ते अगदी ऑक्टोबर २०२० पर्यंत दुकाने बंद होती. वारंवार ही दुकाने लक्ष्य करणे यात हा व्यवसाय बंद पाडण्याचा ही संशय वाटतो, अशी शंका आहे. मुळात ग्राहकांची संख्या घटल्यामुळे भाडे निघणेही अवघड झाले आहे. सलूनमुळे कोरोना पसरतो, असे कुठे झाले आहे का? असा सवालही अरविंद माने या नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.

 आता घर कसे चालवायचे?
आधीच्या लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले आहे. वीज, पाणी आणि मालमत्ताकर, शैक्षणिक शुल्क यात कोणतीही सूट नाही. मग सलून बंद ठेवून घर चालवायचे कसे? यातून सरकारनेच मार्ग सांगावा.
    - संतोष राऊत, सलून व्यावसायिक, ठाणे

शासनाने आखून दिलेले सर्व निकष आधी पाळले जात होते. तरीही सलून व्यवसाय पूर्णपणे बंद केला आहे. हा या समाजावर अन्याय आहे.
    - साहिल सलमानी, सलून व्यावसायिक ,ठाणे.

कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावरच आहे. त्यामुळे नाभिक समाजाकडून ही सहकार्याची भावना आहे. पण हातावर धंदा असल्यामुळे दुसरा पर्याय देखील नाही. या व्यवसायात कोणी भांडवलदार किंवा श्रीमंत ही नाही. तरी प्रत्येक वेळी सलून व्यावसायिकाला टार्गेट केले जाते. दवाखाने तर पीपीई किटसह चालूच आहेत ना? हवे तर कडक निर्बंध घाला? पण सरसकट बंदी नको. कारागिरांसाठी शासनाने आर्थिक पॅकेज द्यावे.
    - विठ्ठल दळवी, सलून व्यावसायिक,
    सल्लागार, श्री संत सेना पुरोगामी नाभिक संघ, ठाणे.

गेल्या लॉकडाऊनमुळे राज्यभरात नाभिक कारागिरांच्या १७ जणांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांसाठी शासनाकडून काहीही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आधी कारागिरांना प्रति महिना २० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे ही केली आहे.
    - सचिन कुटे, अध्यक्ष, श्री संत सेना पुरोगामी नाभिक संघ, ठाणे.

Web Title: CoronaVirus Lockdown News: Beard-cutting has to be done at home for a month now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.