Coronavirus : बदलापूर शहरातील कडक लॉकडाऊनला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 22:54 IST2021-05-07T22:53:35+5:302021-05-07T22:54:05+5:30
Coronavirus News : आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा देखील आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Coronavirus : बदलापूर शहरातील कडक लॉकडाऊनला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी
बदलापूर: राज्य शासनाने लागू केलेल्या लॉक डाऊन आणखीन कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर बदलापूर पालिकेने घेतला आहे . पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मंजुरी दिली. आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा देखील आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकीकडे राज्य शासन नागरिकांना कमीत कमी त्रास होईल त्या अनुषंगाने लॉक डाऊन मध्ये शिथीलता आणत नवनवीन प्रयोग करीत आहे. तर दुसरीकडे बदलापूरातून कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाने शहरात कडक लॉक डाऊन जाहीर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारपासून पुढचे सात दिवस शहरात कडक लॉकडावून जाहीर करीत नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. या कडक लॉक डाऊन मध्ये मेडिकल स्टोअर आणि दवाखाने वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील शुक्रवारी रात्री उशिरा मंजुरी दिली असून आता शनिवारी सलग सात दिवस बदलापूर शहरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.