Coronavirus: कोरोना रुग्णालयास निधी देण्यास भाजपाचा विरोध; पाच लाख देण्यास आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 07:17 IST2020-05-07T05:47:49+5:302020-05-07T07:17:23+5:30
आपला दवाखान्याचे १५० कोटी वापरण्याची सूचना

Coronavirus: कोरोना रुग्णालयास निधी देण्यास भाजपाचा विरोध; पाच लाख देण्यास आक्षेप
ठाणे : शहरात एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मानस ठाणे महापालिकेने व्यक्त केला आहे. यासाठी १३१ नगरसेवकांकडून प्रत्येकी पाच लाखांचा निधी प्रशासनाने मागविला आहे. परंतु, तो देण्यास भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोध केला आहे. नगरसेवकांचा निधी हा तुटपुंजा पडू शकतो, त्यापेक्षा आपला दवाखान्याचा १५० कोटींचा निधी त्यासाठी वापरण्यात यावा, असा सूर भाजपच्या नगरसेवकांनी लावला आहे. त्यामुळे कोविड रुग्णालय उभे राहणार की नाही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरात आता ग्लोबल इन्पॅक्ट हबच्या ठिकाणी एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मानस महापालिकेने व्यक्त केला आहे. या संदर्भात ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन ते लवकरात लवकर उभारावे अशा सुचना दिल्या आहेत. त्यानुसार हे रुग्णालय उभारण्यासाठी ठाणे महापालिकेने नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच पाच लाख रुपयांची मागणी केली आहे. त्या अनुषगांने प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या नगरसेवकांशी चर्चा करून हा निधी देण्याच्या सुचना केल्या आहेत. मात्र, या चर्चेत भाजपाच्या अनेक नगरसेवकांनी हा निधी देण्यास विरोध केला असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालय उभारण्यास आमचा विरोध नाही, किंवा निधी देण्यासही आमचा विरोध नाही. मात्र, नगरसेवक निधीतून केवळ सहा ते साडेसहा कोटी जमा होऊ शकतात. उर्वरित निधी कोठून आणणार असा सवाल त्यांनी केला आहे.
दुसरीकडे भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आयुक्तांना पत्र देऊन नगरसेवक निधीऐवजी आपला दवाखान्यासाठी ठेवलेला १५० कोटींचा निधी या रुग्णालयासाठी देण्याची सुचना केली आहे. शहरात आपला दवाखाना हे सुरू झालेले नाहीत. जे सुरू आहेत, त्याठिकाणी साहित्य, डॉक्टरांची वानवा आहे. त्यामुळे हा निधी वाया जाण्यापेक्षा तो कोरोना रुग्णालयासाठी देण्याची मागणी भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे. त्यामुळे हे रुग्णालय उभे राहणार की नाही? याबाबत शंकाच आहे.