CoronaVirus: खोणीमध्ये १०० मजुरांची उपासमार; तीन दिवसांपासून अन्न नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:26 AM2020-04-24T00:26:34+5:302020-04-24T00:26:41+5:30

जवळचे पैसेही संपल्याने नशिबी आल्या मरणयातना

CoronaVirus: 100 workers starve in cage; No food for three days | CoronaVirus: खोणीमध्ये १०० मजुरांची उपासमार; तीन दिवसांपासून अन्न नाही

CoronaVirus: खोणीमध्ये १०० मजुरांची उपासमार; तीन दिवसांपासून अन्न नाही

Next

- अनिकेत घमंडी 

डोंबिवली : सामाजिक संस्थेने अन्नपदार्थांचे वाटप बंद केल्यामुळे तीन दिवसांपासून खोणी, कल्याण ग्रामीण भागात सुमारे १०० हून अधिक मजुरांना अन्न मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. परिसरातील बांधकाम व्यावसायिकांकडे हाताला मिळेल ते काम करून गुजराण करण्याचे काम ते मजूर करत होते.

लॉकडाउननंतर आतापर्यंत एका सामाजिक संस्थेकडून अन्न वितरित केले जात होते. परंतु, तीन दिवसांपासून ते बंद झाले आहे. त्यामुळे त्या मजुरांवर अन्नाविना दिवस काढण्याची वेळ ओढावली आहे. मजुरांची उपासमार होत असल्याची माहिती मिळताच एका दक्ष नागरिकाने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु, हा परिसर महापालिकेत येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे दक्ष नागरिकाने तहसीलदार दीपक काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी समस्या सुटेल, असे सांगितले. परंतु, संध्याकाळपर्यंत मजुरांची समस्या सुटली नव्हती. त्यामुळे त्यांना अन्न कोण आणि कधी देणार, हा प्रश्न कायम होता.

खोणीतील हे सर्व मजूर परिसरातच बांधकाम व्यवसायिकांकडे काम करतात. लॉकडाउनची समस्या निर्माण झाल्यानंतर त्यांच्या हाताचे काम गेले. त्यानंतर जवळपासचे अन्नधान्य संपल्यानंतर त्यांना एका संस्थेने अन्नाची पॅकेट्स पुरवली. आता मात्र पंचाईत झाली असल्याचे मजुराने सांगितले. तसेच जरी खोणी ग्रामपंचायत कार्यालयात शासनाने अन्न पदार्थ वितरणाची व्यवस्था केली असली तरीही त्या मजुरांच्या घरापासून ते कार्यालय सुमारे चार किमी लांब असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्याबाबत मजुरांना काहीही माहिती नसल्याचे निदर्शनास आले.

आम्हाला खोणी परिसरात अन्नाची पॅकेट्स मिळत होती. तीन दिवसांपासून ते बंद झाले आहे. त्यामुळे जेवढे काही जवळ पैसे होते ते खर्च होत असून आता पुढे काय करावे, हा प्रश्न आहे. आमच्यासह सुमारे १०० मजुरांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. - राम आशीष, मजूर

ग्रामपंचायत कार्यालय, खोणी येथे कम्युनिटी किचनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या मजुरांनी त्या ठिकाणी जाऊन जेवण घ्यावे. अशा भागांमध्ये जे कोणीही गरजू असतील त्यांनी त्या कार्यालयात जाऊन अन्न घ्यावे. - दीपक काकडे, तहसीलदार

Web Title: CoronaVirus: 100 workers starve in cage; No food for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.