स्वच्छ सर्वेक्षणासाठी बनवाबनवी केल्याची अधिकाऱ्यांची कबुली, अहवाल उपलब्ध करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:43 IST2020-02-01T00:43:17+5:302020-02-01T00:43:26+5:30
२०१४ पासून ठाणे महापालिका स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होत आहे.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी बनवाबनवी केल्याची अधिकाऱ्यांची कबुली, अहवाल उपलब्ध करण्याचे आदेश
ठाणे : शहरात निर्माण होणा-या ओल्या कच-याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून त्यापासून खतनिर्मिती करण्याचे दोन प्रकल्प सध्या मुंब्य्रात पालिकेने कार्यान्वित केले आहेत. परंतु, ते केवळ स्वच्छ सर्व्हेमध्ये क्रमांक मिळावा, यासाठीच केल्याची कबुली महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली. लोकमतने ही बनवाबनवी उघड करताच त्याची दखल घेऊन महापौर नरेश म्हस्के यांनी संबंधित विभागाकडे या प्रकल्पाबाबत खुलासा करून त्याचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश दिले.
२०१४ पासून ठाणे महापालिका स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी होत आहे. मात्र, आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च करूनही महापालिकेचा क्रमांक सुधारलेला नाही. काही वर्षांपूर्वी शौचालयांच्या मुद्यावरूनही हा क्रमांक घसरला होता. त्यावेळेसदेखील महापालिकेच्या संबंधित विभागाने शहराच्या काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील शौचालये उभारली होती. आज त्यांची अवस्था दयनीय आहे. केवळ फोटो काढण्यासाठीच ती तेव्हा उभारल्याची माहिती आता समोर आली आहे.
दुसरीकडे मागील वर्षीदेखील पालिकेला शहरात निर्माण होणाºया कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात अपयश आले होते. त्यानंतर आता यंदाच्या वर्षात स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक यावा, यासाठी ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्याचे फसवे प्रकल्प सुरूकरून फोटो काढून ते आता स्वच्छ सर्वेक्षणाकडे पाठविण्यात आले आहेत. आता हे प्रकल्प किती दिवस सुरू राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कदाचित, मुंब्य्रातील हे दोन्ही प्रकल्प येत्या काही दिवसांत गायब झाले नाही, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसणार आहे. अशा पद्धतीने महापालिकेने केवळ स्वच्छ सर्वेक्षणाचीच नाही तर ठाणेकर करदात्यांच्या डोळ्यांतही धूळफेक केली आहे. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाला याबाबत छेडले असता, आम्ही केवळ स्वच्छ सर्वेक्षणातील आमचा क्रमांक सुधारावा, यासाठीच या प्रकल्पांचा तात्पुरता घाट घातल्याचे मान्य केले. मात्र, यात माझे नाव कुठेही येऊ देऊ नका, अशी विनंतीही त्याने केली.
कागदावरील प्रकल्पांवर कोट्यवधींची उधळपट्टी
एका वरिष्ठ अधिकाºयानेच याची कबुली दिल्याने महापालिका कशा पद्धतीने खोटे प्रकल्प उभारून कागदावरील प्रकल्पांसाठी कशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत आहे, हेदेखील आता यानिमित्ताने उघड झाले आहे. आता या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापौर नरेश म्हस्के यांनी संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला आहे. या पत्राद्वारे या मागची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याची माहिती त्यांनी मागितली आहे. पालिकेने सुरू केलेले हे प्रकल्प फसवे आहेत की खरे आहेत, याचा खुलासाही त्यांनी मागविला आहे. तसेच यासंदर्भातील अहवाल तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा, असे आदेशही या पत्राद्वारे त्यांनी संबंधित विभागाला दिले.